कास स्वच्छता मोहिमेचे उत्स्फूर्त स्वागत

कास स्वच्छता मोहिमेचे उत्स्फूर्त स्वागत

सातारा - काससंदर्भात आज प्रसिद्ध झालेल्या वृत्तलेखाचे व एकूणच ‘सकाळ’च्या माहिमेचे विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. केवळ साताराच नव्हे तर कासवर प्रेम करणाऱ्या सातारा जिल्ह्याबाहेरील कासप्रेमींनीही आवर्जून दूरध्वनी करून या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. लोकसहभागातून हाती घेतलेले कास स्वच्छतेसारखे उपक्रम जागतिक वारसास्थळाला अनोखे कोंदण देतील, अशी प्रतिक्रिया युनोस्कोचे निवृत्त प्रतिनिधी डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केली.
प्लॅस्टिक व इतर कचऱ्यात अडकलेल्या कास तलाव परिसराच्या स्वच्छतेसाठी ‘सकाळ’ने हाक दिली आहे. याबाबत आज ‘सकाळ’ने कासचे ऐतिहासिक, भौगोलिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणारा वृत्तलेख प्रसिद्ध केला.

विविध स्तरांतून त्याचे स्वागत झाले. इंटरनेट व व्हॉट्‌ॲपच्या माध्यमातून ही बातमी सर्वदूर पोचली. अजिंक्‍यताऱ्याइतकेच कासवर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी स्वच्छतेच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याची ग्वाही दिली. केवळ साताराच नव्हे तर खटाव, कऱ्हाड, सांगली, येथूनही काही नागरिकांनी नेटवर बातमी वाचून एखाद्या रविवारी मित्रमंडळासह कासला स्वच्छतेसाठी येणार असल्याचा शब्द दिला, तसेच ‘सकाळ’ने पर्यटकांना विधायक वळण लावू पाहणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया.

डॉ. राजेंद्र शेंडे - एखाद्या माध्यमाने पर्यावरण क्षेत्रात उचललेले सकारात्मक पाऊल कौतुकास्पद व आशादायक आहे. त्याबद्दल सकाळ व त्यांच्या सर्व सहकऱ्यांचे प्रथम अभिनंदन. स्वच्छता, साफसुतरेपणा ही आपली नैसर्गिक देणगी आहे. लोकसहभागातून हाती घेतलेले यासारखे उपक्रम जागतिक वारसा स्थळाला अनोखे कोंदण देतील. सातारकर या उपक्रमातून इतरांसमोर आदर्श घालतील, असा विश्वास वाटतो. मी भुवनेश्वरमध्ये आहे. रविवारपर्यंत पोचू शकत नाही. या उपक्रमाला शुभेच्छा.
 
डॉ. उदयराज घोरपडे - अशा स्वच्छता मोहिमेची गरज होती. सर्व सातारकरांनी श्रमदानाच्या कार्यात आपले हात लावले तर काहीही अवघड नाही. रविवार म्हटले, की ‘चला कासच्या स्वच्छतेसाठी’ अशी स्लोगन घराघरांत पोचली पाहिजे. 

संजय पाटील - कास म्हणजे साताऱ्याचा मानबिंदू! कासचे पर्यावरण कासच्या पाण्यासारखे निर्मळ राखण्याचे ‘सकाळ’ने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये आम्ही सातारकर नागरिक खारीचा वाटा उचलू. हीच वेळ आहे कासच्या कचऱ्याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करण्याची. या उपक्रमात सक्रिय सहभागासह शुभेच्छा !’

अंजली कुलकर्णी - कास ही साताऱ्याची जलदेवता आहे. तिचे पावित्र्य राखले गेलेच पाहिजे. ‘सकाळ’ने एक चांगला उपक्रम हातात घेतला आहे. 

राजेंद्र चोरगे - अजिंक्‍यतारा मोहिमेनंतर कास स्वच्छतेचे एक महत्त्वाचे पाऊल ‘सकाळ’ने उचलले आहे. पुढील पिढ्यांवर या मोहिमेचा सकारात्मक संस्कार होईल, असं मला वाटतं. ही मोहीम म्हणजे लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे. मी बालाजी ट्रस्ट, गुरुकुल स्कूल परिवार व व्यक्तिश: या उपक्रमात ‘सकाळ’बरोबर आहे. 

कर्तव्य सोशल ग्रुपचे विजय देशमुख, जिल्हा परिषद मैदानावरील मॉर्निंग ग्रुपचे कार्यकर्ते डॉ. दीपक निकम, वात्सल्य फाउंडेशनचे शशिकांत पवार, भू- विकास बॅंकेमागील दौलतनगरमधील रहिवासी, स्पंदन ग्रुप, गणेश मेळावणे, सुहास पवार आदींनी कास स्वच्छतेच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com