‘कास’च्या विकासाचा पर्यावरणावर भार

‘कास’च्या विकासाचा पर्यावरणावर भार

सुमारे अर्धा अब्ज रुपये खर्चून सातारा-कास पठार रस्ता रुंदीकरणाचे नियोजन आहे. विकासात्मक कामाचे सर्वांनी स्वागतच करायला हवे. मात्र, पर्यटन विकासाचे कारण पुढे करताना पर्यावरण तज्ज्ञांनी वारंवार मांडलेल्या सूचनांचा विचार कुठेच होत नाही. वर्षातील तीन महिन्यांकरिता आता अर्धा अब्ज रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर घातला जात आहे. हा विकास शाश्‍वत आहे का?, हा भार नव्हे; अविचाराने उचललेले पाऊल आहे! 

शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सातारा ते कास पठार (घाटाई फाटा) या सुमारे २० किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याचे आराखडे बनविण्यात येत आहेत. सुमारे ४८ कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे. ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कास पठारावर फुलणारी फुले पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. त्यातही शनिवारी, रविवारी व सरकारी सुटीदिवशी पठारावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दहा ते १५ हजार इतकी असते. वन विभागाची आकडेवारीच हे सांगते. 

रोज तीन हजारांपेक्षा अधिक पर्यटकांना पठारावर प्रवेश न देण्याचे वन विभागाचे धोरण आहे. प्रत्येक बाबीची धारण क्षमता ठरलेली आहे. तशी ती कास पठाराचीही आहे. क्षमतेपेक्षा अधिक भार झाला तर संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडते. 

निसर्गाचेही तसेच आहे. कास पठारावर एका दिवशी तीन हजारांपेक्षा अधिक पर्यटक जावू देता कामा नये, असे अभ्यासाअंती वन विभागाने ठरविले आहे. मग ‘विक एंड’ला इतके पर्यटक पठारावर जातात कसे? एवढी गर्दी झाल्यानंतर वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय, कर्णकर्कश्‍य हॉर्नचा गोंगाट ... हे प्रश्‍न निर्माण होणार हे उघड आहे. प्रशासनाला हे समजत नाही, असे नाही. रस्ते, गटारे, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची कामे झाली पाहिजेत, याबाबत दुमत नाही. डोंगरी भागातही चांगले रस्ते झाले पाहिजेत. तेथील भूमिपुत्रांना रस्त्याची चांगली सुविधा मिळाली पाहिजे, हे जरी खरे असले तरी ‘कास’च्या रस्त्यामागे निराळ्या अर्थकारणाचा वास येतो. हे अर्थकारण स्थानिकांच्या शाश्‍वत विकासाचे मुळीच वाटत नाही. 

कास पठाराचे वैशिष्ट्य जतन करण्यासाठी अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी काही महत्त्वपूर्ण सूचना वेळोवेळी मांडल्या. मात्र, दुर्दैवाने त्यापैकी एकाही सूचनेकडे पर्यावरणीय संवेदनशीलतेने पाहिले गेले नाही. सरकारी यंत्रणाही यात ‘सरकारी’ पद्धतीनेच वागत आली. वाहतूक कोंडीचे कारण पुढे केले जाते. मोसमाचे तीन महिने वगळता एकदाही कास रस्त्यावर कोंडी झाल्याचे उदाहरण ऐकिवात नाही. तीन महिन्यांच्या फुलांच्या मोसमात पर्यटकांची कोंडी टाळण्यासाठी अर्धा अब्ज रुपये आणि नंतर त्याचा देखभाल खर्च वेगळा, हे कितपत परवडणारे आहे. त्यामुळे पर्यटन विकास, रोजगार वाढ याचा विचार केवळ ‘लॉजिंग’ व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनच होतोय का, अशी शंका घ्यायला इथं पुरेसा वाव आहे!

पर्यावरणतज्ज्ञांच्या सूचना
कास पठारापासून पाच किलोमीटर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप टाळावा 
‘कास’चा बफर झोन जाहीर करावा
पर्यटकांना ने-आण करण्याची व्यवस्था असावी 
पठार परिसरात प्रदूषणविरहित बॅटरीवरील वाहनांचा वापर.  
प्लॅस्टिक कचऱ्याला पठारावर प्रवेश असू नये
कास परिसरातील रहिवाशांना ‘पर्यटन विकास’मधून न्याहारी योजना द्यावी 
पर्यटकांसाठीच्या सुविधा साताऱ्यात निर्माण कराव्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com