‘कास’च्या फुलांसाठी थोडं थांबाच..!

‘कास’च्या फुलांसाठी थोडं थांबाच..!

पावसाची उघडीप न मिळाल्याने फुलांना उशीर; एक सप्टेंबरपासून प्रवेशकर लागू
सातारा - जागतिक वारसा हक्काचे कोंदण लाभलेल्या कास पठारावर हलका पाऊस सुरू असल्याने पठारावरील रानफुलांना पुरेसे ऊन मिळाले नाही. परिणामी यावर्षी फुलांचा हंगाम काहीसा लांबण्याची चिन्हे आहेत. हा उशीर लक्षात घेऊन वन विभागाने पठारास भेट देणाऱ्या पर्यटकांकडून घेण्यात येणाऱ्या पर्यावरण कराची वसुली एक सप्टेंबरपासून आकारण्याचा निर्णय घेतला आहे. पठारावर आकर्षक रानफुलांनी हजेरी लावली असली, तरी रंगांची उधळ पाहायची असेल, तर पर्यटकांना काहीशी वाट पाहावी 
लागणार आहे. 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाची हजेरी कायम आहे. कास पठारावरही रिमझिम सुरूच आहे. साताऱ्याची ओळख समजला जाणारा ‘वाय तुरा’ पठारावर डोलू लागला आहे. त्याशिवाय सफेद रंगाची ‘चवर’, तीन पाकळ्यांचा ‘निलिमार’, दातघासणी, सीतेची आसवं, गेंद, रानकांदा, गवेली वेल, दीपकाडी ही फुले अधूनमधून पाहायला मिळत आहेत. पावसात फुलणारी ही फुले आहेत. मात्र, कास पठारावरील रानफुलांना बहर येण्यासाठी पावसाची उघडीप गरजेची आहे. त्यानंतर रानफुलांनी बहरलेले कास पठार पाहायला मिळते. हे अलौकिक दृष्य पाहायला देशभरातून दर वर्षी लाखो पर्यटक येतात. सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते ऑक्‍टोबर असा तीन महिने फुलांचा हंगाम राहतो. या काळात एकदा आलेला पर्यटक दर वर्षी पठारावर हजेरी लावल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी समितीमार्फत पठारावरील व्यवस्थापन पाहिले जाते. पर्यटन करामार्फत मिळणाऱ्या उत्पन्नातून स्थानिकांना रोजगार देण्याबरोबरच परिसरातील ग्रामस्थांच्या शाश्‍वत विकासाची, तसेच भौतिक सुविधांच्या विकासाची कामे केली जातात. 

हंगामाच्या नियोजनासंदर्भात जावळीचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी सांगितले, की पठारास भेट देणाऱ्या पर्यटकांकडून एक सप्टेंबरपासून पर्यटन कर आकारण्यात येईल. त्याकरिता प्रतिमाणसी १०० रुपये शुल्क असेल. १२ वर्षांपर्यंतचे विद्यार्थी, तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (वयाचा खात्रीशीर पुरावा सादर केल्यास) पर्यटन शुल्कातून सूट देण्यात येईल. अभ्यास दौऱ्यातील विद्यार्थ्यांना २० रुपये प्रती विद्यार्थी शुल्क आकारले जाईल.’’ 

कास पठारावर मिनी बसची सोय
पठारावर प्रवेश करताना संकलन केंद्रावर शुल्क आकारणी होईल. त्यानंतर पर्यटकांची वाहने कास तलावाजवळच्या पार्किंगपर्यंत जातील. पार्किंग, तसेच कॅमेरा आदींसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नाही. पार्किंगपासून पठारापर्यंत ने- आण करण्यासाठी  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मिनी बसची व्यवस्था असेल. अर्थात या प्रवासाचे महामंडळाचे स्वतंत्र तिकीट प्रवाशाला घ्यावे लागेल. तसा ‘एसटी महामंडळ’ व वन विभागाचा करार झाला आहे. 
 

रोज तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश
कास पठारावरील पर्यटकांच्या गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी रोज तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. पर्यटकांसाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर वन विभागामार्फत बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. गर्दी, गोंगाट, वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय आदी कटकटींपासून दिलासा हवा असेल, तर पर्यटकांनी सरकारी सुटी व विकएंडचा दिवस वगळून इतर दिवशी पठारावर यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com