रानफुलांच्या व्यावसायिक शेती संशोधनाला आक्षेप

शैलेन्द्र पाटील
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सातारा - कास पठारावरील रानफुलांवरच्या व्यावसायिक शेतीसाठी संशोधन करण्याच्या पुष्प संशोधन संचालनालयाच्या इराद्यावर येथील निसर्ग अभ्यासक व वनस्पती तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवले आहेत. ‘समूहामधून काही वनस्पती बाहेर काढून संवर्धनाचा प्रयत्न केल्यास कास पठारावरील इतर वनस्पतींना धोका पोचू शकतो,’ असे मत त्यांनी नोंदवले आहेत. अशा  पद्धतीचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे नाही. जागतिक निसर्ग वारसा जतन स्थळ असल्यामुळे वनस्पतींचे नुकसान होईल, अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी दिली जाणार नाही, असे उप वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले आहे. 

कास पठारावरील फुलांवर संशोधन करून नवीन वाण विकसित करण्यात येणार आहेत. या वाणांच्या व्यावसायिक विस्तारासाठी या फुलांची शेती करणे शक्‍य आहे का, यावर वन विभागाच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करण्याचा पुण्याच्या पुष्प संशोधन संचालनालयाचा मानस आहे.

संचालनालयाच्या या प्रयत्नावर येथील वनस्पती तज्ज्ञांचा आक्षेप आहे. कास पठारावर दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ५० वनस्पती व ९८ प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. या वनस्पतींचे त्यांच्या मूळजागीच संवर्धन करणे गरजेचे आहे, असे आक्षेप घेणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. 

या संदर्भात लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्रा. शेखर मोहिते यांनी सांगितले, ‘‘वनस्पतींचे सुद्धा समूह असतात. त्या समूहाने तेथील वातावरणाशी त्या एकरूप झालेल्या असतात, तसेच समूह आपण कृत्रिमरीत्या तयार करू शकत नाही. ‘कास’च्या बाबतही हे लागू पडते. समूहातून काही वनस्पती बाहेर काढून संवर्धनाचा प्रयत्न केल्यास पठारावरील इतर वनस्पतींना धोका पोचू शकतो.’’

कास पठारावरील सूक्ष्म हवामान, तेथील पाऊस, हवेतील आर्द्रता, समुद्रसपाटीपासूनची उंची, माती हे सर्व कृत्रिमरीत्या तयार करता येणे शक्‍य नाही. आपण कृत्रिमरीत्या त्या वनस्पतींची संख्या वाढवू शकतो; परंतु ते पुढे टिकवणे अतिशय अवघड असते. नैसर्गिक आपत्ती, मोठे वणवे, धरणाखाली येणारी जंगले, तीव्र दुष्काळ अशा परिस्थितीत मूळस्थानाबाहेर वनस्पतींचे संवर्धन व वाढ केली गेली पाहिजे, असेही प्रा. मोहिते यांनी स्पष्ट केले.

पठारावरील वनस्पतींच्या प्रदेशनिष्ठतेमुळे त्या बाहेरील वातावरणात तग धरू शकणार नाहीत. येथील वनस्पतींचा कोणीही येऊन अभ्यास करू शकते; परंतु येथून रोपे घेऊन जाऊ शकत नाही. वन विभागाने अशा प्रयत्नांना परवानगी दिलेली नाही व तशी देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे वनविभागाचे उप वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

‘पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे. तेथील ५० प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्या ‘धोकादायक’ या स्थितीत आहेत. त्यांचे आहे त्याठिकाणी जतन व संवर्धन केले जाईल,’ असे श्री. अंजनकर यांनी सांगितले.

आपल्याकडे बागेत असलेल्यांपैकी ८० टक्के वनस्पती विदेशी आहेत. शोभिवंत व आकर्षक अशा रानफुलांच्या वनस्पतींवर संशोधन होऊन त्या शेतात व बागेत आल्या पाहिजेत. आपल्याकडे मोठी जैवविविधता व संपदा असताना या वनस्पती आपल्या बागेत कशा वाढू शकतील, यावर संशोधन होणार असेल, तर ते होऊ द्यावे. फक्त हे काम नियंत्रित पद्धतीने व्हावे. पठारावरील सर्वच वनस्पती इतरत्र नेऊन वाढविता येणार नाहीत. प्रदेशनिष्ठ वनस्पती अशा प्रयोगांना दाद देणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे. 
- डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पती तज्ज्ञ, कोल्हापूर

Web Title: satara news kas pathar flower agriculture research