कास घाटरस्ता खचला!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

सातारा - यवतेश्‍वर घाटातील रस्ता आज सकाळी खचल्याने कास पठाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक पर्यटकांना पठाराकडे जाता आले नाही. दरम्यान, दुपारपासून घाटरस्त्यातील वाहतूक किरकोळ दुरुस्तीनंतर एकेरी स्वरूपात सुरू करण्यात आली. रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, पावसाचा अडथळा न आल्यास एका महिन्यात रिटेनिंग वॉलसह काम पूर्ण होईल, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी व्यक्त केला.

सकाळी आठच्या सुमारास कासहून साताऱ्यामध्ये येणाऱ्या ग्रामस्थांना रस्ता खचल्याचे निदर्शनास आले. काहींनी हा प्रकार पोलिसांना, तसेच वनविभागास कळविला. पोलिसांनी बोगद्यानजीक कासकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद केली. कासला मुक्कामी गेलेल्या पर्यटकांना वनविभागाने साताऱ्याला जाण्यासाठी एकीवमार्गे मेढा- सातारा या पर्यायी रस्त्याचा वापर करा, असे सुचविले. त्यानुसार अनेक जण या पर्यायी रस्त्याने साताऱ्याला आले. दैनंदिन कामासाठी येणारे ग्रामस्थ मात्र खचलेल्या रस्त्याच्या मार्गाने साताऱ्याकडे धिम्या गतीने येत होते. नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका प्राची शहाणे, तसेच नित्यनेमाने व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्ता खचल्याच्या ठिकाणी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना दगड लावण्यासाठी, फक्की टाकण्यासाठी मदत केली. पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी घटनास्थळी दोन जेसीबीसह चार ट्रॅक्‍टर पाठवून डोंगराकडेच्या बाजूला भराव टाकण्याच्या सूचना केल्या. बांधकाम विभागाच्या तीन ते चार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामास प्रारंभ केला. दुपारी दोननंतर दोन्ही बाजूने एकेक गाड्यांची वाहतूक सुरू झाली. सायंकाळी पाचपर्यंत 90 मीटर अंतराचा (मुरुम व मातीचा) रस्ता तयार झाला. उद्यापासून (मंगळवार) रिटेनिंग वॉल, तसेच रस्ता दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला जाणार आहे. पावसामुळे कामास अडथळा येऊ शकतो; परंतु एका महिन्यात काम पूर्ण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

गरजेनुसार रोज दोन तास रस्ता बंद
घाट रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी त्याठिकाणी दोन्ही बाजूस पोलिस व बांधकाम विभागाचे कर्मचारी तैनात असणार आहेत. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना उभे केलेले अडथळे दिसावेत यासाठी रिफ्लेक्‍टर्स लावण्यात आले आहेत. काम सुरू असताना आवश्‍यकता भासल्यास दररोज दोन तास रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली.

ऑनलाईन बुकिंग केलेल्यांना दिलासा
रस्ता खचल्याने आज सकाळी आठपासून साताऱ्याहून कासकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. ज्यांनी कासपुष्प पठार पाहण्यासाठी ऑनलाइन बुकिंग केले होते, त्यांच्यासाठी संकेतस्थळावर निःशुल्क पुनर्नोंदणी अथवा परतावा देण्याची व्यवस्था वनविभागाने केल्याची माहिती देण्यात येत होती.