घाण करून जातंय गाव...येतंय सातारकरांवर नाव! 

घाण करून जातंय गाव...येतंय सातारकरांवर नाव! 

सातारा - ‘घाण करून जातंय गाव अन्‌ सातारकरांवर नाव,’ अशी काहीशी निसर्गरम्य कासची अवस्था झाली आहे. कास तलाव भोवतालची अवस्था अक्षरश: कचराकुंडीसारखी झाली आहे. दारूच्या काचेच्या फुटक्‍या बाटल्यांमुळे पूर्वी कासला उपरोधाने ‘काच’ तलाव म्हटले जायचे, आता ही उपाधी बदलून प्लॅस्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेस्टन, पत्रावळ्या- द्रोण, पाण्याचे ग्लास, दारूच्या बाटल्या आदींमुळे त्याला ‘प्लॅस्टिक’ तलाव म्हणावे की काय अशी परिस्थती आहे. 

निसर्गात फिरायला जायचे आणि आपली घाण, कचरा तेथे टाकून निसर्ग विद्रूप करून यायचे, हा अलीकडे लोकांचा स्वभाव झाला आहे. कास तलाव परिसरात दर वर्षी हजारो पर्यटक हजेरी लावतात. वनभोजनाचा आनंद घेतात. आपल्या सोबतचा कचरा तेथेच टाकून परत येतात. येताना तेथे आधीच पडलेला कचरा पाहून ‘सातारकर किती कचरा करतात,’ असा शेरा मारायलाही ते विसरत नाहीत. पावसाळ्यात डोंगर उतारावरून वाहून आलेले पाणी हा कचरा वाहून कास तलावात नेते. विघटन न होणारा कचरा तलावाच्या तळाशी साचून दिवसेंदिवस तलाव गाळाने भरत आहे. 

अशी होते घाण
कास तलावावर ओल्या- सुक्‍या पार्ट्या झडतात. तलावाच्या काठावर बाटल्या फोडल्या जातात. थर्माकोलच्या पत्रावळ्या, प्लॅस्टिकचे ग्लास, दारू व थंडपेयाच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, द्रोण, चहाचे कप, पिशव्या, खाद्यपदार्थांची वेस्टने आदी विघटन न होणाऱ्या कचऱ्याचे ढिग तलावालगतच्या झाडांमध्ये साठलेले आढळतात. तलाव परिसरात पडलेल्या याच वस्तू नंतर वाऱ्याने उडून तलावात जातात. नष्ट न होणारा हा कचरा दिवसेंदिवस पर्यावरणाचे मोठे नुकसान करत आहे. काही मंडळी तलावातच वाहने-भांडी धुतात. 

स्वच्छता मोहिमा 
कासच्या झुडपांत पडलेला कचरा वाऱ्या- पावसाने तलावात वाहून जात असल्याने सातारकरांचे पाणी दूषित होत आहे. हे टाळण्यासाठी नगरपालिका वर्षभरात वरचेवर तलाव परिसर स्वच्छतेच्या मोहिमा काढते. त्यात काही ट्रक कचरा गोळा होतो. या कचऱ्यात ९५ टक्के कचरा प्लॅस्टिक असल्याचे दिसून आले आहे. पालिकेबरोबरच स्वच्छतेच्या अनेक नागरी मोहिमा निघतात. मात्र, स्वच्छता करणाऱ्यांपेक्षा कचरा करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने मोठे आहे. परिणामी कासला कधीही जावा कचरा पडलेला दिसतोच. 

असंच चालायचं?
बाहेरून लोकांनी येऊन कास परिसरात कचऱ्याच्या माध्यमातून घाण करून जायची आणि पालिका किंवा कोणीतरी स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी येथे येऊन ती काढायची, हे असे किती दिवस चालणार? जबाबदार पर्यटन झाले पाहिजे. लोकप्रबोधनाबरोबरच दुसऱ्याच्या जीवितास घातक वर्तन व निसर्गाचे नुकसान केल्याबद्दल नियमभंग करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाची फौजदारी कारवाई झाली पाहिजे.

‘‘कास तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने केवळ सहानुभूती व्यक्त करून चालणार नाही. कासमधील स्थानिक रहिवासी, सातारा पालिका आणि सातारकरांनी या शहराच्या पाण्याचा साठा सुरक्षित व विना प्रदूषित राहण्यासाठी जनजागरण व पुरेशी जागरूकता ठेवावी. संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे कासचे व्यवस्थापन दिल्यास स्वच्छता व पर्यटकांना इतर सुविधा मिळू शकतील.’’  
- कन्हैयालाल राजपुरोहित, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com