सातारा- पंढरपूर महामार्ग चौपदरी नव्हे; दुपदरीच 

सातारा- पंढरपूर महामार्ग चौपदरी नव्हे; दुपदरीच 

कोरेगाव - सातारा- पंढरपूर राज्य रस्त्याला महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, हा महामार्ग चौपदरी नव्हे तर दुपदरीच होणार असून, त्याचे काम सुरू झाले आहे. सर्वप्रथम क्षेत्रमाहुली येथील कृष्णा नदीच्या पुलापासून रस्त्याच्या दुतर्फा झाडे तोडण्यास सुरवात झाली असून, त्यात पंढरपूरपर्यंत तीन हजार झाडांवर कुऱ्हाड पडताना डोळ्याने पाहावे लागणार आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या कामात जितकी झाडे तुटणार आहेत, त्याच्या चौपट झाडांचे रोपन करून ती जगवणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता पी. एस. आवटी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सातारा- पंढरपूर राज्य रस्त्याची वाहतूक व गरज लक्षात घेऊन या रस्त्याला महामार्गाचा दर्जा जानेवारी २०१७ मध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता आता चौपदरी होणार वगैरे चर्चा सुरू झाली होती. मात्र, प्रत्यक्षात हा रस्ता महामार्ग असेल; परंतु तो दुपदरी काँक्रिट आणि कडेला शोल्डर असा असेल. रस्त्याची एकूण रुंदी १४ मीटर असेल. त्यात मुख्य दुपदरी रस्ता हा दहा मीटर असेल, तर दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मीटर अंतराचे शोल्डर म्हणजे मुरमी रस्ता असेल. रस्त्यासाठी अत्यल्प भूसंपादन करावे लागणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जेथे वळण असेल तेथे किरकोळ भूसंपादन करावे लागणार आहे. त्याची झळ फार मोठ्या प्रमाणात लोकांना बसणार नाही. 

महामार्गाचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळित होईल. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शहरांच्या विकासात भर पडेल. व्यावसायिक दृष्टीने शहरांचा  कायापालट होईल; परंतु रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुमारे तीन हजार झाडांवर कुऱ्हाड कोसळताना सर्वांना पाहावे लागणार आहे. त्यामधून पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर उभा राहणार आहे, हे कदापि नाकारता येणार नाही. 

कोरेगाव व पुसेगावातूनच महामार्ग
कोरेगाव व पुसेगाव ही मोठी बाजारपेठेची शहरे आहेत. कोरेगावात नव्याने नगरपंचायत झालेली आहे, तर पुसेगावला ग्रामपंचायत आहे. ही दोन्ही गावे दिवसेंदिवस विस्तारत असताना या गावातून महामार्ग जाणार की बायपास होणार, याबाबत नागरिकांत उत्सुकता आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाने सध्या बायपास न करता हा महामार्ग या दोन्हा गावांमधूनच नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात रस्त्याकडेला शासकीय जागेत असलेली अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. पाच वर्षांने या दोन्ही शहरांबाहेरून ‘बायपास’ रस्त्याचा विचार होऊ शकतो, असेही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.         

यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जेवढी झाडे तोडली जातील त्याच्या पाचपट झाडांचे रोपण करून ती जगवण्याची ग्वाही दिलेली असली, तरी ही ग्वाही प्रत्यक्षात येणार का? हा प्रश्‍न आहे. झाडे लावणे आणि जगवण्याचे काम हे ठेकेदारावर सोपवण्यात येते. त्यामुळे ते किती प्रत्यक्षात येणार हा संशोधनाचा विषय असेल. याबाबत रस्ते  विकास महामंडळाने लेखी हमी जनतेला द्यायला हवी अशी चर्चा सुरू झाली आहे. अन्यथा जेव्हा बिगरशेती करताना संबंधिताच्या जागेतील जेवढी झाडे तोडली जातील तेवढी लावण्याची हमी घेतली जाते. मात्र, प्रत्यक्षात ती येत नाही. असे येथे होऊ नये, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.   

महामार्ग करताना कृष्णा नदीवरील पुलाची रुंदीही वाढवण्यात येणार आहे. एकूण पूल १६ मीटर रुंद होईल. पुलाचे शक्‍यतो एका बाजूला वाइडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होईल, असे महामंडळाचे कार्यकारी अभियंता डी. व्ही. पिसोळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. सध्याच्या जुन्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे बुजविण्याचे कामही युद्धपातळीवर महामंडळाच्या माध्यमातून सुरू झाले असून, लवकरच ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com