कुमुदिनी तलावावर कमळांची चादर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कास - जागतिक वारसा स्थळ व पुष्पपठार म्हणून ओळख असणाऱ्या कास पठारावरील कुमुदिनी तलाव पांढऱ्या फुलांनी बहरला आहे. या फुलांच्या बहराने तलावावर पांढऱ्या कमळांची चादर चढवल्याचा आभास निर्माण होत आहे. या वर्षी पावसाळा लांबत चालल्याने पठारावरील फुलांचा हंगामही जास्त काळ चालेल, असा अंदाज आहे. 

कुमुदिनी तलाव पठारावरून पश्‍चिमेकडे जाणाऱ्या ऐतिहासिक राजमार्गावर वसला आहे. त्या राजमार्गाला लागूनच सुमारे दोन हेक्‍टर क्षेत्रावर हा तलाव आहे. ऑगस्ट, सप्टेंबरच्या दरम्यान कुमुदिनीला पांढरी फुले येण्यास प्रारंभ होतो. सध्या या तलावावर पांढरी चादर चढवल्याचा आभास निर्माण होत आहे. या फुलांच्या मंद सुवासाने सर्व परिसर सुगंधित होतो. दरम्यान, कास पठार तेरड्यासह पांढरे गेंद, सीतेची आसव, सोनकी, निसुर्डी, पिंडा, कंदील पुष्प, मिकी माउस, बंबाकू, हालुंदा आदी फुलांनी बहरून गेले आहे. 

तलावाकडे जाताना मोठी कसरत 
कुमुदिनी तलावातील पांढरी फुले पाहण्यासाठी पर्यटकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्यापासून दोन ते तीन किलोमीटर आत हा तलाव असल्याने तिथपर्यंत पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे बहुतांश पर्यटक तलावाकडे जाण्याचे टाळतात. जुना राजमार्ग पूर्ण खराब झाला असून मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयात पाणी साचून मोठी तळी तयार झाली असून या पाण्यातूनच वाट काढत जावे लागत आहे.