सुशिक्षित युवकांकडे कौशल्याचा अभाव

सुशिक्षित युवकांकडे कौशल्याचा अभाव

सातारा - सुशिक्षित युवक आहेत, नोकऱ्या भरपूर आहेत. मात्र, या युवकांकडे पुरेसे कौशल्य नाही. ही स्थिती बेरोजगारी वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे, म्हणूनच शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला आहे.

युवकांकडून एक रुपयाही न घेता शासन त्यांना कौशल्यपूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. युवकांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असे मत जिल्हा कौशल्य विकास अधिकारी व रोजगार, उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

‘सकाळ’च्या कॉफी वुईथ सकाळ या उपक्रमांतर्गत श्री. जाधव यांनी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती दिली. श्री. जाधव म्हणाले, ‘‘प्रमोद महाजन कौशल विकास कार्यक्रम’ फार कमी राज्यांत सुरू आहे. सातारा जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ५३ संस्थांची नेमणूक करण्यात आली असून, त्यापैकी ३५ संस्थांत प्रशिक्षण सुरू आहे. त्यामध्ये ४८ बॅचेस सुरू आहेत. आतापर्यंत ११२ बॅचेसच्या माध्यमातून एक हजार ४२९ युवक विविध प्रकारचे प्रशिक्षण घेत आहेत. आतापर्यंत तीन हजार २९५ युवकांनी असे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यापैकी अनेकांनी आपला स्वतंत्र उद्योग तर काहींना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.’’ 

प्रशिक्षण कार्यक्रमात १६ क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये सीएनसी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, दुचाकी व चारचाकी वाहन दुरुस्ती, अन्नप्रक्रिया, ट्रॅव्हलिंग ॲण्ड टुरिझम, फॅशन डिझायनिंग, प्रॉडक्‍शन ॲण्ड मॅन्युफॅक्‍चरिंग आदींचा समावेश आहे. यामध्ये अन्नप्रक्रिया आणि ट्रॅव्हलिंग ॲण्ड टुरिझम या नवीन प्रशिक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व प्रशिक्षण मान्यताप्राप्त संस्थांतून मोफत दिले जाते. याबदल्यात संबंधित संस्थांना सेवायोजन कार्यालयाकडून प्रति विद्यार्थी तासानुसार पैसे देण्यात येतात. तसेच प्रशिक्षण कालावधीत युवकांचे मॉनिटरिंग होण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात आली आहे. यामध्ये ७५ टक्के हजेरी आवश्‍यक आहे. तसेच सेवायोजन कार्यालयातून सर्व प्रशिक्षण संस्थांवर मॅनिटरिंग होते. त्यामुळे युवक मधूनच हे प्रशिक्षण सोडून जाऊ शकत नाही. आजपर्यंत ८८२ युवकांना रोजगाराची संधी मिळाली असून, ८२ युवकांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे.

युवकांना त्यांच्या परिसरातच कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध होत असले तरी युवकांत हे प्रशिक्षण पूर्ण करून नोकरी वा उद्योग व्यवसाय करण्याची मानसिकता निर्माण करण्याचे काम या प्रशिक्षणातून केले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावरही अनेकांचे नोकरी करावी असे मत राहते. त्यामुळे स्वयंरोजगार करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. तर स्वयंरोजगार करण्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. संबंधित संस्थेला तीन ते चार टप्प्यांत प्रशिक्षणाचे पैसे सेवायोजन कार्यालयाकडून मिळतात. त्यामुळे युवक प्रशिक्षण मधूनच सोडून गेल्यास संस्था व प्रशिक्षणार्थीचे नुकसान होते. त्यामुळे दोघांनाही हे प्रशिक्षण पूर्ण करण्यावर भर द्यावा लागतो. मुळात युवकांनी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर नेमकी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे, हे ओळखून प्रशिक्षण कोणते घ्यायचे, ते निवडणे आवश्‍यक आहे. 

सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत शिरवळ, सातारा येथे मॅन्युफॅक्‍चरिंग उद्योग अधिक असल्याने येथे सीएनसी ऑपरेटरची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर महाबळेश्‍वर, पाचगणी येथे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हलिंग व्यवसायाला अधिक महत्त्व आहे. मुळात जिल्ह्यात शेती व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तेव्हा शेतीप्रक्रिया उद्योगांबाबतचे प्रशिक्षण घेण्याकडे युवकांचा कल राहणे आवश्‍यक आहे. सध्या साताऱ्यात फूड पार्क सुरू होत आहे. त्यासाठी अन्नप्रक्रिया प्रशिक्षणास अधिक महत्त्व आले आहे. तसेच दुचाकी व चारचाकी वाहने दुरुस्ती, बॅंकिंग आणि अकाउंटिंग, रिटेलिंग यावर अधिक भर दिला गेला आहे. तसेच होम फर्निचरिंग, व्हरमी कल्चर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मेडिकल ॲण्ड नर्सिंग सारखी प्रशिक्षणेही उपलब्ध आहेत. 

कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या वेबवाईटवर जाऊन युवकांनी अधिक माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

योजना पारदर्शक 
शासनाचे असे कार्यक्रम म्हणजे पैसा खाण्याचा धंदा असा प्रवाद आहे. पण, प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम राबविताना ते पारदर्शकच असावेत, त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ नये याची काळजी नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com