रक्तसंक्रमणातून वाचविले श्‍वानाचे प्राण

रक्तसंक्रमणातून वाचविले श्‍वानाचे प्राण

महाबळेश्वर - पाचगणी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल झालेल्या श्‍वानास तातडीने रक्त चढविण्याची आवश्‍यकता होती. श्वानाच्या जीवास धोका होता. रक्त संक्रमणासारखे उपचार केवळ मुंबईतच होतात. हे श्‍वान मुंबईपर्यंत जावू शकत नव्हते. अशा अवघड प्रसंगी पुशवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. बुधे यांनी पाचगणीतच श्‍वानावर रक्त संक्रमण करण्याचा निर्णय घेतला. प्रयत्नांची पराकाष्टा करून त्यांनी श्वानाचे प्राण वाचविले. 

काही आजारांमध्ये रुग्णांना बाहेरून रक्त देण्याचे उपचार ही आता सर्वसाधारण बाब आहे. परंतु, हे उपचार श्‍वानांवर करणे तसे दुर्मिळ आणि अवघड आहे. दांडेघर येथील वृषाली मालुसरे यांनी  पामेरियन जातीचे पांढऱ्या रंगाचे श्‍वान उपचारासाठी पाचगणीतील पुशवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. एस. डी. बुधे यांनी श्‍वानाची तपासणी केली. त्यावेळी श्‍वानात रक्ताची कमतरता आढळून आली. रक्त संक्रमणाची तातडीने आवश्‍यक्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राण्यांमध्ये रक्त संक्रमणाचे उपचार केवळ मुंबईतच होतात. कारण प्राण्यांची रक्तपेढी तेथील पुशवैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहे. प्राण्यांमध्ये एकूण १८ रक्तगट आहे. आजारी श्‍वानाचा रक्तगट तपासून त्या गटाचे रक्त उपलब्ध करणे, तशी अवघड आणि तारेवरची कसरत होती. त्यासाठी भरपूर वेळही लागणार होता. श्वान मालकाने श्वानावरील उपचारासाठी मुंबईला जाण्याची असमर्थता व्यक्त केली. तेव्हा डॉ. बुधे यांनी पाचगणीतच श्‍वानावर रक्त संक्रमणाचा निर्णय घेतला. त्यासाठी पुन्हा दुसऱ्या तंदुरुस्त पामेरियन जातीच्या श्‍वानाचा शोध सुरू झाला. सुदैवाने हवे असलेले श्‍वान पाचगणीतच उपलब्ध झाले. त्या श्‍वानाचे रक्त काढून त्याच्या आवश्‍यक चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर तीनच तासांत आजारी श्‍वानावर रक्त संक्रमणाचे उपचार सुरू झाले. आजारी श्‍वानामध्ये हिमोग्लाबिन कमी झाले होते. उपचारामुळे त्याची पातळी वाढली. काही दिवस उपचार केल्यानंतर हे श्‍वान ठणठणीत झाले.

मुंबईशिवाय होणार नाहीत, असे अवघड उपचार पाचगणीसारख्या डोंगराळ भागात करून श्‍वानाचे प्राण वाचवू शकलो, याचे मोठे समाधान आहे.

- डॉ. एस. डी. बुधे,  पशुवैद्यकीय अधिकारी, पाचगणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com