अखेर मंगेशची पहाट झालीच नाही...

अखेर मंगेशची पहाट झालीच नाही...

कलेढोण - काल दुपारी दोन वाजल्यापासून जिल्ह्यासह राज्यातील आबालवृद्ध, माध्यमांचे लक्ष केवळ मंगेश जाधव या पाच वर्षांच्या बालकाकडे लागून राहिले होते. काल मंगेश खेळता खेळता बोअरमध्ये घसरला. सुमारे ३०० फूट बोअरमध्ये अडकून असलेला जीव मदतीसाठी आक्रोश करीत होता. त्याच्या मदतीसाठी आबालवृद्ध, नागरिक, पोलिस, जवान, वैद्यकीय यंत्रणा प्रयत्न करीत होत्या. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र, कालपासून मृत्यूशी झुंज देण्याच्या मंगेशच्या जीवनात आजची पहाट झालीच नाही. चिमुकल्या जिवाने जगण्यासाठी केलेली धडपड मन हेलावून टाकणारी ठरली. 

विरळी (ता. माण) येथील मंगेश हा सुटी असल्यामुळे शेतात काल आईसमवेत जनावरे राखण्यासाठी गेला होता. खेळताना त्याचा पाय घसरून बोअरवेलमध्ये पडला व सुमारे वीस फूट खोल तो अडकला. आपल्या कोवळ्या जिवाच्या रडण्याच्या आवाजाने आई रूपाली, वडील महेश यांचे हृदय थक्क झाले. थोड्याच वेळात मंगेश बोअरमध्ये अडकल्याचे वृत्त जिल्ह्यासह राज्यात पसरले. बोअरमध्ये लहान मुलगा अडकल्याचे समजल्यानंतर कुकुडवाड, वडजल, शेनवडी, झरे (सांगली) आदी गावांतील ग्रामस्थ विरळीत दाखल झाले होते. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेची सर्वजण दूरध्वनी व सोशल मीडियाद्वारे माहिती घेत होते. एवढेच नव्हेतर एसटी, खासगी वाहनांतून व दुचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी मंगेशच्या बातमीवर लक्ष देवून होते. आषाढी वारी करणारे ‘विठ्ठला’कडे साकडे घालत होते, तर ईद नमाज पठण करणारे ‘अल्ला’कडे मंगेशसाठी दुवा मागत होते. ‘एनडीआरएफ’चे पथक, ग्रामस्थ आणि पोलिसांनी आपल्या केलेल्या प्रयत्नांमुळे रात्री दोनच्या सुमारास मंगेशला बाहेर काढले. कोण म्हणत होते, मंगेशचे पाय हालताना दिसले? कोण म्हणत होते, त्याचा श्वास सुरू आहे. मात्र, हे सर्व अंदाज खोटे ठरले. मंगेशच्या नाका-तोंडामध्ये माती गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. म्हसवडला उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. अन्‌ सगळ्याचे डोळे पुन्हा वाहू लागले. पाच वर्षांच्या जिवाशी नियतीने खेळलेल्या खेळाने सर्वजण थक्क झाले. सोमवारी दुपारी बोअरमध्ये अडकलेला मंगेश रात्रभराच्या प्रयत्नानंतरही परत आलाच नाही. अखेर त्याच्या जीवनात पहाट झालीच नाही.

ग्रामस्थांचा आशावाद फोल ठरला
रात्रभर बोअरजवळ बसून राहिलेले ग्रामस्थ सकाळी मंगेशची बातमी ऐकून सकाळी सकाळीच गळून पडले होते. मंगेश बरा होऊन घरी येईल, हा त्यांचा विश्वास फोल ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com