‘हल्लाबोल’ला साताऱ्यातील संघर्षाची किनार

‘हल्लाबोल’ला साताऱ्यातील संघर्षाची किनार

सातारा - एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती सोडून राष्ट्रवादीचा प्रत्येक उमदेवार कसा निवडून येईल याकडे लक्ष देण्याचा कानमंत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. आपापसातील भांडणे विसरून वाकबगार असलेल्या शत्रूला नमविण्याचेच उद्दिष्टच समोर ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे साताऱ्यातील खासदार व आमदारांतील संघर्ष आगामी काळात कोणते वळण घेतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

खासदार उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या आमदारांनी बहिष्कार टाकल्यामुळे गाजला होता. त्यामुळे आमदार व खासदारांमधील संघर्षाची ठिणगी उघड पडली. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन साताऱ्यात धडकले. साताऱ्यातील युवाशक्तीचे पाठबळ दाखवण्यासाठी शहरातून रॅली निघाली. शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या प्रत्येक कृतीतून पक्षश्रेष्ठींना आक्रमकता दाखविण्याचा प्रयत्न केला. भाषणाही त्यांनी आपला अजेंडा स्पष्ट केला. साताऱ्याचा कोणी एकटा मालक नाही, हे दाखवून देण्यासाठीच ही रॅली काढल्याचे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले. तळागाळात कामे आमदारांनी करायची, कष्ट त्यांनी सोसायचे आणि त्याचा लाभ दुसऱ्यांनीच घेणे हे बरोबर नाही, असे म्हणत थेट उदयनराजेंवर त्यांनी निशाना साधला. आता कुणाला सुट्टी नाय असे म्हणत आमदारांच्या शिलेदारानेही व्यासपीठावरून उदयनराजेंना आव्हान दिले.

उदयनराजे नको, कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणू असा विश्‍वास पक्षश्रेष्ठींना देण्यासाठीच शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धडपड उघडपणे केली.शिवेंद्रसिंहराजेंना आश्‍वस्त कसे करायचे का उदयनराजेंना अंगावर घ्यायचे, अशी कोंडी वरिष्ठांची झाली होती. तटकरे व अजित पवारांनीही संयम ढळू दिला नाही. एक पक्षश्रेष्ठी व्यासपीठावरच आहेत, वेळ मिळाल्यावर दुसऱ्यांच्या कानावरही घालतो, एवढेच बोलत तटकरेंनी हा विषय संपवला. अजितदादांचा स्वभाव पाहता उदयनराजेंच्या प्रश्‍नावर ते बेधडक बोलतील, अशीच कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. दादा बोलले. मात्र, त्याचेही दोन अर्थ निघाले. सध्याची परिस्थिती पाहता एकमेकाला खाली खेचण्याची वृत्ती सोडा. आमदार असो किंवा खासदार राष्ट्रवादीचा राज्यातील प्रत्येक उमेदवार निवडून आलाच पाहिजे, ही दादांची कानपिचकी नेमकी कोणाला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ती खासदार व आमदारांनी लागते. भाजपच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस मिटली पाहिजे, हे वास्तव आहे. त्याला साजेशीच भूमिका अजितदादांकडून घेतली गेली. त्यामुळे उदयनराजेंविरोधात उभ्या ठाकलेल्या फळीलाही त्यांचा अप्रत्यक्षपणे इशाराच गेला आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातील खासदार व आमदारांमधील हा संषर्घ कोणत्या वळणार जातो, याकडे जनतेचे लक्ष राहील. 

आडवे येणाऱ्यांची बिनपाण्याने करा...
माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजेंना चुचकारून आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला. तुमच्यात आलेल्या आक्रमकपणाला शोभणारी दाढी आता काढू नका आणि आडवे येणाऱ्यांची बिनपाण्याने करा हे त्यांचे वक्तव्य समर्थकांचे कान सुखावून गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com