‘डीपीसी’त विजयासाठी राष्ट्रवादीचा होमवर्क!

‘डीपीसी’त विजयासाठी राष्ट्रवादीचा होमवर्क!

सातारा - जिल्हा नियोजन समितीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. मतदानाला अवघे चार दिवस राहिले असून, मोर्चेबांधणीला वेग आला आहे. जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीने ‘तयारी’ केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी त्याची रणनीती ठरविली असून, आता राष्ट्रवादी सदस्यांना ‘सांगेल तसे’ मतदान करणे, इतकेच बाकी राहिले आहे. काँग्रेस, भाजपकडूनही व्यूहरचना आखण्यात आल्या आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. सात) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया आहे. बुधवारी (ता. नऊ) सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी आहे, अशी माहिती अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या निवडणुकीसाठी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर, २९ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, कऱ्हाड विकास आघाडी, सातारा विकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील नऊ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून, राष्ट्रवादीतून बाबासाहेब पवार, मंगेश धुमाळ, शिवाजी चव्हाण, रमेश पाटील, मानसिंगराव जगदाळे, उदय कबुले, काँग्रेसमधून निवास थोरात, जिजामाला नाईक-निंबाळकर, भाजपमधून मनोज घोरपडे, कऱ्हाड विकास आघाडीचे ॲड. उदयसिंह पाटील, पाटण विकास आघाडीचे विजय पवार हे नशीब आजमावत आहेत. 

महिला राखीव प्रवर्गातील दहा जागांसाठी ११ उमेदवार असून, त्यात दीपाली साळुंखे, उषादेवी गावडे, भारती पोळ, जयश्री फाळके, संगीता मस्कर, अर्चना रांजणे, संगीता खबाले-पाटील (राष्ट्रवादी), सुनीता कदम (काँग्रेस), सुवर्णा देसाई (भाजप), अर्चना देशमुख, अनिता चोरगे (सातारा विकास आघाडी), अनुसूचित जाती प्रवर्गातील (पुरुष) एका जागेसाठी बापू जाधव (राष्ट्रवादी), सागर शिवदास (भाजप), अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (महिला) दोन जागांसाठी मधू कांबळे, वनिता पलंगे (राष्ट्रवादी), रेश्‍मा शिंदे (भाजप) या निवडणूक लढवत आहेत.

जिल्हा परिषद मतदारसंघातून २२ उमेदवारांसाठी ६४ सदस्य मतदान करतील. त्यात राष्ट्रवादीबरोबर कऱ्हाड विकास आघाडी आहे. राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार विजयी करण्यासाठी संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी जिल्हा परिषदेत तब्बल तीन तास चर्चा केली. त्यामध्ये कोणत्या उमेदवाराला कोणी कोणत्या क्रमाकांचे मतदान करायचे, याची व्यूहरचना आखण्यात आली. मतदान कसे करायचे, यासाठी उद्या (ता. ४) राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची रंगीत तालीमही घेतली जाणार आहे. एकंदरीत ‘राष्ट्रवादीचं ठरलंच आहे, आता फक्‍त मतदान करायचं,’ असेच चित्र आहे. 

...ही आहेत मतदान केंद्रे
या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुढीलप्रमाणे केंद्र व ठिकाण निश्‍चित केली आहेत. मतदान केंद्र क्र. एक - (ग्रामीण निर्वाचन क्षेत्र- जिल्हा परिषद मतदारसंघ)- रोजगार हमी योजना शाखेची जुनी इमारत सातारा, मतदान केंद्र क्र. दोन - (संक्रमणकालीन निर्वाचन क्षेत्र- नगरपंचायत मतदारसंघ)- मिटिंग हॉल, पहिला मजला, नियोजन भवन सातारा, मतदान केंद्र क्र. तीन - (लहान नागरी निर्वाचन क्षेत्र- नगरपालिका मतदारसंघ)- नियोजन विभागाच्या तळमजल्यातील सभागृह सातारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com