"राष्ट्रवादी युवक'च्या जिल्हाध्यक्षपदी तेजस शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

सातारा - राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये चार युवकांना बाजूला करत कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजस शिंदे यांनी बाजी मारली. या निवडीतून आमदार शिंदेंनी आपल्या मुलाचे राजकारणात यशस्वी लॉंचिंग केले आहे. 

सातारा - राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये चार युवकांना बाजूला करत कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजस शिंदे यांनी बाजी मारली. या निवडीतून आमदार शिंदेंनी आपल्या मुलाचे राजकारणात यशस्वी लॉंचिंग केले आहे. 

लक्षवेधी ठरलेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये वाईचे ऍड. विजयसिंह पिसाळ, साताऱ्याचे नगरसेवक बाळू खंदारे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचा जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, गजेंद्र मुसळे, तसेच कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र तेजस शिंदे यांची नावे अंतिम टप्प्यात होती. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी आपल्याला हे पद मिळावे, अशी आग्रही मागणी केली होती. दरम्यानच्या काळात नियोजन समितीची निवडणूक लागल्याने राष्ट्रवादीने खंदारे यांना नगरपालिका मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांची युवकची जिल्हाध्यक्ष होण्याची मागणी मागे पडली. त्यानंतर ऍड. विजयसिंह पिसाळ यांचेच नाव निश्‍चित होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. दुसरीकडे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना पक्षाच्या कामासाठी राज्यभर दौरे करावे लागणार आहेत; परिणामी त्यांचा मतदारसंघाशी संपर्क कमी- जास्त प्रमाणात होत होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील ही बाब लक्षात आली. त्यांनीच आमदार शिंदे यांचे पुत्र तेजस यांना युवकचे जिल्हाध्यक्ष करून त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात लॉंचिंग करण्याचा ध्यास घेतला होता. त्यानुसार आमदार शिंदे यांच्याशी काहींनी चर्चा करून त्यांची संमती घेतली होती. त्यानंतर ही बाब माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालण्यात आली. त्यांनीही तेजस शिंदे यांचीच निवड युवकांची फळी बांधण्यासाठी योग्य ठरणार असल्याचे मान्य केले. त्यानुसार युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी तेजस यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी निश्‍चित केले. 

मिडलेक्‍स विद्यापीठातून पदवी 
तेजस शिंदे यांनी मुंबईत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर लंडन येथील मिडलेक्‍स विद्यापीठातून पदवी घेतली आहे. सध्या ते ट्रॅक्‍टर एजन्सीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. कोरेगाव मतदारसंघात युवकांचे संघटन बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.