मातृसुरक्षेसाठी खासगी डॉक्‍टरांचे एक पाऊल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

सातारा - गरोदरपणातील उपचार, प्रसूती म्हटले की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नकोच, अशी काही कालावधीपूर्वीची मानसिकता आता बदलू पाहात आहे. एवढेच नव्हे, तर सर्वसामान्य गरोदर मातेला सुरक्षितता मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला खासगी डॉक्‍टरांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्ह्यातील ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत हे खासगी डॉक्‍टर दर महिन्यातून एकदा जाऊन गरोदर मातांची तपासणी करत आहेत. हे पाऊल इतरांसाठी आदर्शवत ठरणारे आहे.

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘दत्तक आरोग्य केंद्र’ योजना राबविली. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक ‘पीएचसी’ दत्तक देऊन या अभियानातील शिबिरादिवशी प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला त्यांना आरोग्य केंद्रात पाठविले. त्यावेळी ‘पीएचसी’मध्ये गरोदर महिलांची तपासणी व्यवस्थित होते का? ‘पीएचसी’मध्ये कोणत्या सोयी-सुविधा आहेत किंवा नाहीत? आदींची तपासणी हे अधिकारी करतात. त्याचा अहवाल डॉ. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्याकडे दिला जातो. 

हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी डॉ. देशमुख यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनांतर्गत (आयएमए) जिल्हा स्त्रीरोग संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सागर कटारिया, सचिव डॉ. संजय जाधव व जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. संजोग कदम यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांनी या शिबिरात उपस्थित राहून गर्भवती, अति जोखमीच्या मातांची तपासणी करावी, असे नियोजन झाले. त्यातून खासगी डॉक्‍टरांचे सामाजिक दायित्वही निभावले जात आहे. 

जिल्हा परिषदेने मातृत्व सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविल्याने, तसेच त्याला खासगी डॉक्‍टरांनी पूर्णपणे सहकार्य केल्याने अतिजोखमींच्या मातांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. एप्रिल २०१७ पासून हा उपक्रम राबविला असून, त्याला सातत्याने यश मिळत आहे. हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठीही अनुकरणीय ठरणारा आहे.

...असा झाला बदल
नोव्हेंबर २०१६ मध्ये हे अभियान सुरू झाले तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रांत ५६९ गरोदर मातांची तपासणी केली होती. गत मे २०१७ मध्ये तब्बल दोन हजार ४०० गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. सातत्याने खासगी ४४ डॉक्‍टर पीएचसींना भेट देत आहेत. शिवाय, अतिजोखमीच्या मातांना अस्पिरिन दिली जात असल्याने माता मृत्यू प्रमाण घटू लागले आहे, अशी माहिती डॉ. दिलीप माने यांनी दिली.