आणखी १५ इन्क्‍युबेटरची मागणी करणार - डॉ. भोई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भकांच्या अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या बालकांना योग्य उपचार देता यावेत, यासाठी आरोग्य संचालक कार्यालयाकडे आणखी १५ इन्क्‍युबेटरची मागणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आणखी दोन बालरोग तज्ज्ञांची तातडीने नियुक्ती केली जाणार आहे.

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भकांच्या अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या बालकांना योग्य उपचार देता यावेत, यासाठी आरोग्य संचालक कार्यालयाकडे आणखी १५ इन्क्‍युबेटरची मागणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आणखी दोन बालरोग तज्ज्ञांची तातडीने नियुक्ती केली जाणार आहे.

याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी दिली. कमी कालावधीत जन्म घेतलेल्या बाळाचे वजन कमी असते. बाहेरील वातावरणाशी सामना करण्याची ताकद त्यांच्यात कमी असते. त्यामुळे त्यांना इन्क्‍युबेटरमध्ये (काच पेटी) ठेवावे लागते. त्यामध्ये मुलाला आवश्‍यक असलेले तापमान राखून उपचार केले जातात. त्यातून अशा मुलांचा मृत्यू रोखण्यात मदत होते. खासगी रुग्णालयामध्ये अशा उपचारासांठी दर दिवशी हजारो रुपयांचा खर्च होतो. सामान्यांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे बहुतांश नातेवाईक जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतात. त्यामुळे १५ इन्क्‍युबेटर असलेल्या या विभागात दररोज साधारण २० ते २५ लहान मुले उपचारासाठी दाखल होतात. 

त्यामुळे काही वेळा एका पेटीत दोन-दोन मुलांना ठेवावे लागते. बालकांच्या उपचारात होणाऱ्या गैरसोईबाबत ‘सकाळ’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले.
त्या वृत्ताची दखल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी घेतली. जिल्हा रुग्णालयातील या विभागात आणखी १५ बेड व १५ इन्क्‍युबेटरला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आरोग्य संचालक कार्यालयाकडे पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या विभागासह एकूण बालरोग विभागातील काम अधिक सक्षमपणे होण्यासाठी आणखी दोन बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागविले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच मुलाखतीतून वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.