अन्‌ त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले!

अन्‌ त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले!

सातारा - मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी, त्यामुळे घरी आजी-आजोबा दोघच. उन्हाळा म्हटले की कुठे जाऊ असं त्यांना व्हायचं. कारणही तसचं होतं; टंचाईमुळे बोअरवेलमधील खालावलेली पाणीपातळी, पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. अशा स्थितीत खासगी टॅंकरवर दोन-अडीच महिने काढायचे म्हणजे खर्चात वाढ सोबत पाणी भरण्याचा विकतचा मन:स्ताप अशी स्थिती! परंतु, गेल्या वर्षी त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले अन्‌ दीर्घ कालावधीनंतर यावर्षीचा उन्हाळा त्यांच्यासाठी सुसह्य ठरला! 

साताऱ्यातील केसकर व मोरे कॉलनीतील प्रत्येकाकडे स्वत:च्या बोअरवेल आहेत. त्यातूनच ते पाण्याची गरज भागवतात. आतापर्यंत पावसाळ्यापर्यंत बोअरचे पाणी त्यांना साथ देत होते. गेल्या काही वर्षांत हे चित्र पालटले. एप्रिल सुरू झाला की १५ मिनिटेही बोअर चालत नव्हती. सुमारे अर्धा किलोमीटरच्या परिघात शे-दीडशे बोअरवेलने जमिनीची अक्षरश: चाळण झालेली. पुनर्भरणाच्यादृष्टीने काहीच उपाययोजना राबविल्या न गेल्याने २२५ फूट खोलीवर गेलेल्या बोअरही उन्हाळ्यात सलग पाच मिनिटेही पाणी देत नाहीत. 

धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयातून ‘सुप्रिटेंड’ या पदावरून निवृत्त झालेले पी. डी. सौदीकर व सौ. सौदीकर यांनी दै. ‘सकाळ’मधील रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबतचे वृत्त वाचून ही उपाययोजना केली. छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करून ते बोअरवेलमध्ये सोडले. मे २०१७ मध्ये त्यांनी हे काम करून घेतले. एप्रिलमध्ये बंद होणारे बोअरचे पाणी आजअखेर पुरले आहे. मार्चपासून त्यांनी बोअरच्या पाण्यावर घराच्या अंगणात दोन हजार लिटरची पाण्याची टाकी भरून ठेवली. पण, उन्हाळा संपला तरी या पाण्याचा वापर करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही.

पर्यावरण तज्ज्ञ रवींद्र सासवडे म्हणाले, ‘‘आपण जमिनीतून हवे तेवढ्या पाण्याचा उपसा करतो. परंतु, पुनर्भरणासाठी काहीच करत नसल्याने उन्हाळ्यात काही ठिकाणी २५० फुटांपेक्षा खोल पाणीपातळी जाते. भविष्यातील पाण्याचे संकट टाळायचे असेल तर पावसाचे पाणी अडवावे लागेल. त्याकरिता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’शिवाय दुसरा कमी खर्चिक व सोपा उपाय नाही.’’

उन्हाळ्यात पाण्याच्या टॅंकरसाठी दोन-अडीच हजार रुपये खर्च व्हायचे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला मला १६ हजार रुपये खर्च आला. यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची कोणतीही कमतरता भासली नाही. माझा ९० टक्के खर्च वसूल झाला. 
- पी. डी. सौदीकर, मोरे कॉलनी, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com