घंटागाडीचालकांना सव्वासात लाख दंड

घंटागाडीचालकांना सव्वासात लाख दंड

सातारा - घंटागाडी दांडी मारते, गाडीवर बिगारी नसतो... अशा अनेक तक्रारी नागरिकांतून येतात. सातारा पालिका या घंटागाड्यांवर वर्षाला सुमारे पाऊण कोट रुपये खर्च करते. एवढा खर्च करूनही वेळच्या वेळी कचरा उचलला जात नसल्याने पालिकेने या गाडीचालकांकडून गेल्या दहा महिन्यांत सुमारे सव्वासात लाख रुपये दंड वसूल केला आहे. 

कचरा कुंडीमुक्त शहर करण्यासाठी साताऱ्यात सुमारे १२ वर्षांपूर्वी घंटागाड्या सुरू झाल्या. सुरवातीला चार वॉर्डात मिळून एक गाडी होती. नंतर ती प्रत्येक वॉर्डात वेगळी सुरू करण्यात आली. ज्याठिकाणी कचरा निर्माण होतो, अशा ठिकाणाहून म्हणजे घर टू घर कचरा गोळा करून तो थेट सोनगाव कचरा डेपोवर नेऊन टाकण्याचे काम या गाड्या करतात. साताऱ्यात रोज ६८ ते ७० टन कचरा निर्माण होतो. ४१ घंटागाड्यांमार्फत हा कचरा डेपोवर नेऊ टाकला जातो. या घंटागाड्यांवर पालिका महिन्याला सहा लाख रुपये खर्च करते, तरीही उघड्यावर कचरा पडतोच. घंटागाडीचालकाने दांडी मारल्यास नागरिकांना आपल्या कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावावी लागते. काही लोक ओढ्यांमध्ये, उघड्यावर, रिकाम्या प्लॉटमध्ये कचऱ्याच्या पिशव्या भिरकावतात. 

अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच घंटागाड्यांना शिस्त लागावी म्हणून कामात कुचराई करणाऱ्या घंटागाडीचालकांवर दंडात्मक तरतूद ठेवली आहे. या तरतुदीनुसार गेल्या दहा महिन्यांत या घंटागाडीचालकांकडून सुमारे सव्वासात लाख रुपये दंड वसूल झाला आहे. तांत्रिक दोष अथवा इतर कारणाने घंटागाडी बंद राहिल्यास एका दिवसाला ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. याशिवाय प्रत्येक घंटागाडीवर बिगारी ठेवणे घंटागाडीचालकावर बंधनकारक असते. बऱ्याचदा या गाड्यांवर बिगारी हजार नसतो, तसे आढळल्यास प्रत्येक दिवसाला दीडशे रुपये याप्रमाणे घंटागाडी चालकाला दंड केला जातो.  गेल्या दहा महिन्यांत घंटागाडीचालकाने दांडी मारल्याच्या कारणामुळे ४१ गाड्यांकडून एक लाख ४० हजार रुपये दंड पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. बिगारी नाही या कारणामुळे पाच लाख ८२ हजार रुपये दंड वसूल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com