कारखाने सुरू झाल्याने फलटणला गजबज

कारखाने सुरू झाल्याने फलटणला गजबज

फलटण शहर - तालुक्‍यातील कारखान्यांची धुरांडी पेटल्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गजबजाट दिसत असून, वाहतूक शाखेचे कर्मचारी कोंडी सोडविण्याऐवजी शासकीय तिजोरी भरण्यावरच अधिक भर देत असल्याचे दिसत आहे. 

अवैध धंदे व तस्करी वाहतुकीचा मुख्य रस्ता असल्याचे भासवून एमएच ११ पासिंग व्यतिरिक्त वाहन दिसल्यास त्याच्याकडून चिरिमिरीसाठी तासन्‌तास हुज्जत घालणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी निदर्शनास येतात. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणारे, तसेच मालवाहू गाडी चालकांना कायम फलटण वाहतूक शाखेची धास्ती असते, तर शहरात मुख्यतः जिंती नाका, नाना पाटील चौक, पृथ्वी चौक, गिरवी नाका ही ठिकाणे शहरात प्रवेश करण्याचे प्रमुख मार्ग आहेत, तर याच परिसरात छोटे- मोठे व्यावसायिक, डॉक्‍टर्स स्थिरावले असल्याने नियमित याठिकाणी गर्दी पाहण्यास मिळते; परंतु वाहतूक शाखेकडून फक्त नाना पाटील चौकात एक किंवा दोन कर्मचारी नियंत्रणासाठी पाठविण्यात येतात. मग उर्वरित कर्मचारी काय करतात? असा सवाल सर्वसामान्यांना सहजतेने पडत असतो.

शहरातील अंतर्गत रस्ते हे कायम गजबलेले असून, सर्व सुविधांची पूर्तता तालुक्‍याच्या ठिकाणी होत असल्याने किमान ३० टक्के ग्रामीण भागातील नागरिक शहरात कामानिमित्त वावरताना दिसतात. 

परिणामी रस्त्यांवरील कोंडीत अजूनच भर पडत असल्याचे दिसून येते. त्यात पार्किंगसाठी अपुरी जागा मिळत असल्याने क्रेन चालकांची चांदी होताना दिसत आहे. वाहतूक नियम व कायदा याचे उदाहरण देऊन नागरिकांची बोलती बंद केली जात आहे.

प्रवाशांशी सामंजस्याने वागावे 
शहरातील प्रमुख चौकांसह वाहतूक शाखेने शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्याकडे भर दिला पाहिजे व कारवाई करण्याने समस्या सुटणे शक्‍य नसून, त्यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी सामंजस्याने वागणे गरजेचे आहे, तर प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती तातडीने करावी व शहरातून वाहतूक शाखेचे पेट्रोलिंग करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com