"त्या' बेपत्ता कुटुंबाचा पोलिसांकडून कसून शोध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सातारा - तामजाईनगरमधून बेपत्ता झालेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबाच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. 

सातारा - तामजाईनगरमधून बेपत्ता झालेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबाच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. 

माजी सैनिक राहुल गणपत आढाव (वय 40) पत्नी रूपाली, मुलगी समृद्धी (वय 12) व सिद्धी (वय 7, सर्व रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांच्यासह बेपत्ता झाले आहेत. त्यांची आई कुसुम गणपतराव आढाव (वय 73, रा. क्षेत्रमाहुली) यांनी काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. 4 जुलै रोजी ते नातेवाईकांकडे जातो, असे सांगून पत्नी व मुलींना घेऊन घरातून बाहेर पडले. तेव्हापासून हे चौघेही बेपत्ता असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बेपत्ता होण्यापूर्वी राहुल यांनी लिहिलेल्या दहा पानी चिठ्ठीमुळे खळबळ उडाली आहे. त्यामध्ये खासगी सावकारीने वेढले असल्याचे म्हटले आहे. दागिने, जमीन विकून पैसे दिल्यानंतरही त्यांचा विश्‍वासघात झाला. संशयितांनी वेळोवेळी अपरात्री घरामध्ये घुसून दमदाटी, शिवीगाळ केली. त्यामुळे राहता फ्लॅट घरातील वस्तूंसह विकावा लागला. हा त्रास, अपमान, आर्थिक दुर्दशा सहन न झाल्याने अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. 

विळखा सावकारीचा 
गेल्या तीन महिन्यांपासून साताऱ्यात खासगी सावकारांचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे खासगी सावकारांच्या विळख्याची भयानकता समोर येऊ लागली आहे. त्यातच आढाव यांची चिठ्ठी मिळाल्यामुळे एकंदर प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिस दलातही खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शाहूपुरी पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागालाही आढाव कुटुंबीयांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वेगवेगळी पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत.