जिल्हाध्यक्षपदाच्या वादावर बाबांचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

सातारा - काँग्रेस सभासद यादीतील घोळ, ब्लॉक समिती निवडी व जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमधील दोन आमदारांचा वाद विकोपाला गेला आहे. या वादावर तोडगा काढण्यासोबतच नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रणनीती आखली आहे. येत्या दोन- चार दिवसांत सर्व नेतेमंडळी एकत्र बसून जिल्हाध्यक्षाचे नाव निश्‍चित केले जाणार आहे; पण जिल्हाध्यक्ष निवडीत कोणाचे पारडे जड राहणार याकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

सातारा - काँग्रेस सभासद यादीतील घोळ, ब्लॉक समिती निवडी व जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमधील दोन आमदारांचा वाद विकोपाला गेला आहे. या वादावर तोडगा काढण्यासोबतच नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रणनीती आखली आहे. येत्या दोन- चार दिवसांत सर्व नेतेमंडळी एकत्र बसून जिल्हाध्यक्षाचे नाव निश्‍चित केले जाणार आहे; पण जिल्हाध्यक्ष निवडीत कोणाचे पारडे जड राहणार याकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील व माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. आनंदराव पाटील यांनी केलेली सभासद नोंदणीवर आमदार गोरेंनी आक्षेप घेत या याद्या रद्द कराव्यात, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांपुढे केली आहे. या दोघांच्या वादाकडे दुर्लक्ष करून वादाच्या मूळ कारणांवर निर्णय घेण्याची तयारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘निवडणुका सुरू झाल्या, की काही प्रांताध्यक्ष, जिल्हाध्यक्षांचा रोल संपतो. आता बीआरओ, पीआरओ व डीआरओ यांना सर्वाधिकार येतात. त्यांच्यापुढे आम्ही सर्वांनी आपापले म्हणणे मांडले आहे. आनंदराव पाटील गेली बरेच वर्षे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आम्ही नवीन अध्यक्ष निवडणार आहोत. नवीन जिल्हाध्यक्ष सर्वांच्या विचाराचा व्हावा, असे आम्हाला वाटते. पदासाठी सर्व जण येतात; पण पक्षासाठी वेळ देत नाहीत. पक्षासाठी वेळ देणारा कार्यकर्ता आम्ही निवडणार आहोत. ज्यांना काँग्रेसच माहिती नाही, अशांना अध्यक्ष करून चालणार नाही. येत्या दोन तारखेला सभासद नोंदणी यादीवर बीआरओ निर्णय देतील. त्यानंतर दोन दिवसांत सर्वांच्या विचाराने जिल्हाध्यक्ष निवड होईल.’’ 

याबाबत जयकुमार गोरेंशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘बाबांच्या नावावर स्वत:ची दुकानदारी त्यांनी आजपर्यंत चालविली. आता त्यांच्या दुकानातील माल संपला आहे.’’ पृथ्वीराज बाबा आमचेही नेते आहेत. तुम्ही त्यांना नेते मानता मग प्रदेशला सभासद नोंदणीच्या याद्या देताना बाबांना विचारले होते का? असा प्रश्‍न करून गोरे म्हणाले, ‘‘प्रदेशने त्यांच्या याद्या का स्वीकारल्या नाहीत. मतदार यादीतील नावे उतरून घेऊन याद्या तयार केल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीशी कोण लढू शकतो, पक्ष संघटनेसाठी वेळ देऊ शकतो, अशा कार्यकर्त्याची निवड जिल्हाध्यक्षपदासाठी झाली पाहिजे. पक्ष कोणाच्या मालकीचा नाही. कार्यकर्त्यांचा मालकीचा पक्ष असून, कार्यकर्तेच ठरवतील कोण अध्यक्ष करायचे; पण निवडीत कार्यकर्त्यांचा मतांचा आदर राखला पाहिजे.’’

आम्ही पृथ्वीराज चव्हाणांना सर्वाधिकार दिले आहेत. ते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. विनाकारण पक्षात बेदिली माजविण्याचा काहींचा उद्योग सुरू आहे. तो त्यांनी थांबविला पाहिजे. आपला सर्वांचा नेता पृथ्वीराज चव्हाण हे आहेत. ज्या काही तक्रारी असतील त्या त्यांच्यापुढे मांडा. 
- आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

पृथ्वीराज बाबांना सर्वाधिकार दिलेले असताना बाबांना न विचारता प्रदेशला याद्या का सबमिट केल्या? नानांचे आता वय झाले आहे. त्यांची रिटायर्डमेंटची वेळ आली आहे. पक्ष, संघटनेत नवीन लोकांना काम करू द्या. त्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे.
- जयकुमार गोरे, आमदार, माण- खटाव

Web Title: satara news politics