प्राथमिक शिक्षक संपाच्या तयारीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सोशल मीडियावर चर्चा; २७ फेब्रुवारीचा आदेश रद्द करण्याची मागणी

सातारा - ग्रामविकास विभागाने काढलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर आता संपावर जाण्याची तयारीही शिक्षकांनी सुरू केली आहे. प्राथमिक शिक्षकांशी निगडित असलेल्या सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये या संबंधीच्या पोस्टही व्हायरल होत आहेत. राज्यातील ग्रामसेवक दोन-दोन महिने संपावर जातात. संपाद्वारे ते आपल्या मागण्या मान्य करून घेतात. तेच धोरण अवलंबण्याचे आवाहनही केले जात आहे. 

राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षास १५ जूनपासून सुरवात होत आहे. नेमक्‍या त्याच दिवसापासून शिक्षक संपावर जाण्याच्या तयारीला लागले आहेत. १५ जूनला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा विचार ते करत आहेत. १६ जूनला राज्यातील सर्व पंचायत समित्यांमधील शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याचा त्यांचा विचार आहे. १७ जूनला ‘रास्ता रोको’ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १८ जूनला महाराष्ट्र बंद करण्याबाबतची पोस्ट शिक्षक संघटनांच्या ग्रुपवर फिरत आहेत. ३१ मे ऐवजी ३० जूनपर्यंत बदली करण्यास सरकार जिद्दीस पेटले असेल, तर आपण का गप्प बसावे, ही तीव्र भावनाही व्यक्‍त केली जात आहे. 

शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या संदर्भात काढण्यात आलेला २७ फेब्रुवारीचा आदेश रद्द करावा, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप केला जाणार आहे. शिक्षकांनी या संपाची तयारी करताना ग्रामसेवकांशी तुलना केली आहे. ग्रामसेवक आपल्या मागण्यांसाठी संप करतात, त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपाचे हत्यार उपसण्यावर विचार करत आहेत. 

लाइक-अनलाइक
शिक्षक नेत्यांकडून प्रतिसाद मिळावा, यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांशी चर्चा करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्याला काही शिक्षक संघटनेतील काही पदाधिकारी हे पाठिंबा दर्शवत आहेत, तर त्या पोस्ट काही शिक्षक ‘अनलाइक’ही करत आहेत.