खासगी सावकारांविरुद्ध फास  आवळला!

खासगी सावकारांविरुद्ध फास  आवळला!

सातारा - साताऱ्याला पडलेला खासगी सावकारीचा विळखा सोडविण्यासाठी कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता शहर पोलिसांची जोमदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे पोलिस दलावरचा नागरिकांचा विश्‍वास वाढण्यास मदत होत आहे. पोलिसांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आता नागरिकांनी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. पोलिसांच्या कारवायांमध्ये समोर येणारे नग पाहिल्यावर लोकप्रतिनिधींनीही कोणाला जवळ करायचे, याचा धडा घेणे आवश्‍यक आहे.

साताऱ्यासह जिल्ह्यात खासगी सावकारांचा फास मोठ्या प्रमाणावर आवळला गेला आहे. अडचणीतील माणूस हेरून त्याला सावकारीच्या जाळ्यात ओढण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. सावकारीच्या माध्यमातून कोणताही कामधंदा न करणारे कोटींची उड्डाणे घेत आहेत. आलिशान गाड्यांमधून फिरत आहेत. या पैशाच्या जिवावर युवकांचा ताफा जवळ बाळगायचा. त्यातून राजकारण्यांना भुरळ पाडायची, असले धंदे जिल्ह्यातील सर्वच भागात सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेला माहिती असणारे यांचे धंदे प्रशासकीय यंत्रणांना दिसत नव्हते. त्यांच्या पर्यंत पोचत नव्हते, असे नाही. पिचलेला, नाडलेला पोलिसांपर्यंत पोचत होता. मात्र, पोलिसच लाभार्थी झालेले असतील, तर कारवाई कशी होणार? प्रकरण तक्रारीपूर्वीच मिटायचे. त्यामुळे पोलिस माझे काही वाकडे करू शकत नाहीत, असे छातीठोकपणे बोलण्याची हिम्मत खासगी सावकारांची झाली होती. त्यामुळे पिचलेल्या नागरिकाला पोलिसाकडे जाण्याची धास्तीच वाटत होती.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील व उपअधीक्षक खंडेराव धरणे व शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील व सध्याचे नारायण सारंगकर यांनी ही धास्ती मोडून काढण्याची मोलाची भूमिका बजावली आहे. सहायक निरीक्षक समाधान चवरेंचा रेटाही महत्त्वाचा ठरतोय. कोट्यवधींचा व्यवहार करणारे सावकार मागेल तेवढे पैसे पोलिसांना देण्यास तयार असतात. या आमिषाला बळी न पडता गेल्या दोन महिन्यांपासून सातारा पोलिसांची कारवाई सुरू आहे. सुरवातीला प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकरचे सावकारीचे साम्राज्य मोडून काढण्यास सुरवात झाली. खासगी सावकारीच्या गुन्ह्यात लगेच जामीन मिळवून पुन्हा ऐटीत धंदे करायला हे सावकार सरावलेले आहेत. एकेकाच्या क्रूर कृत्यांची माहिती ऐकून सर्वसामान्य थबकून जाईल, अशी आहे. हे ओळखून पोलिसांनी योग्य कलमे लावण्यास सुरवात केली. मोक्का हा खासगी सावकारांवर जालीम उपाय ठरू शकतो. खंड्यावर झालेल्या कारवाईतून ते दिसत आहे. कायद्यालाही गुलाम मानणाऱ्या या सावकारांना अशाच कायद्याचा उतारा आवश्‍यक आहे. सातारा पोलिसांनी तो द्यायला सुरवात केली आहे. मात्र, खंड्याप्रमाणेच सर्व सावकारांच्या टोळ्यांना मोक्का लागला तरच यांचा पुरता बिमोड होऊ शकतो.

काल रात्रीही मल्हारपेठेतील महेश तपासे, उमेश तपासे व त्यांच्या साथीदारांवर दरोडा व सावकारीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांची यंत्रणा तातडीने ॲक्‍शनमध्ये आली. सुमारे दोन तास त्यांच्या घरांची झडती सुरू होती. त्यातूनही बरीच प्रकरणे पोलिसांच्या हाताला लागणार आहेत. त्यामुळे खासगी सावकारांवर पोलिसांची दहशत बसायला सुरवात झाली आहे. खासगी सावकार किती मोठा असो किंवा कोणाच्याही जवळचा असो सुटणार नाही, हे पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांतील कारवाईतून दाखवून दिले आहे. त्यामुळे तक्रारदारांनाही पुढे येण्याचा विश्‍वास निर्माण झाला आहे. तरीही पाहिजे तेवढी साथ पोलिसांना मिळताना दिसत नाही. खासगी सावकाराच्या त्रासाला बळी पडलेल्या प्रत्येक पिचलेल्या नागरिकाने तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे. 

लोकप्रतिनिधींनीही धडा घ्यावा
लोकप्रतिनिधींनीही पोलिसांच्या या कारवायातून धडा घेणे आवश्‍यक आहे. सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्यांना लोकप्रतिनिधी का जवळ करतात, हा खरा प्रश्‍न आहे. सावकारांची एक-एक कृत्ये शरमेने मान खाली घालायला लावणारी आहेत. अनेकांच्या महिलांवर हात टाकण्याचे प्रकार काही जणांकडून झालेत. तरीही लोकप्रतिनिधींना यांचा एवढा पुळका का, असा प्रश्‍न आता सर्वसामान्यांमधून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची पिळवूणक करणाऱ्यांच्या पाठीशी राहण्याऐवजी त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधींनी ठाम उभे राहिले पाहिजे. नागरिकांना तक्रारीसाठी पुढे येण्यास ताकद दिली पाहिजे; अन्यथा कोणत्या सावकारासाठी कोणत्या नेत्याचे किती फोन आले, याची नोंद पोलिस स्टेशन डायरीत करत आहेतच. तेही कधीतरी जनतेसमोर येईलच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com