धरणांच्या परिसरात दमदार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

सातारा - जिल्ह्यात अनेक दिवसांच्या उघडिपीनंतर तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. कोयनेसह प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरणात 48.36 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात गेल्या 24 तासांत सरासरी 17 मिलिमीटर पाऊस झाला. 

सातारा - जिल्ह्यात अनेक दिवसांच्या उघडिपीनंतर तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. कोयनेसह प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरणात 48.36 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात गेल्या 24 तासांत सरासरी 17 मिलिमीटर पाऊस झाला. 

राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणात प्रती सेकंद 33 हजार 174 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरण क्षेत्रातील कोयना येथे 90, नवजा येथे 106, महाबळेश्‍वर येथे 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाणीसाठ्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांत 2.987 टीएमसीने वाढ होऊन 47.27 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. तद्‌नंतर सायंकाळी पाच वाजता हाच पाणीसाठा 48.36 टीएमसीवर पोचला. रात्री उशिरापर्यंत कोयना परिसरात संततधार सुरूच होती. 

इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण वाढल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. धोम धरणात 4.89, कण्हेर 4.03, उरमोडी 5.56, तारळी 3.159, धोम-बलकवडी 1.80 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

तीन दिवसांपासून पश्‍चिमेकडील भागात चांगला पाऊस होत असल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. भाताच्या पिकांसाठीही पाऊस फायदाचा ठरत असल्याने शेतकरी सुखावत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास नागरिकांनी 02162-232175 व 02162-232349 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. 

माण, फलटण कोरडेच 
जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी, कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : सातारा 13.9 (288.6), जावळी 28 (569.8), पाटण 25 (410.1) , कऱ्हाड 4.9 (119), कोरेगाव 2.6 (94.2), खटाव 3.7 (164.7), माण-0 (180), फलटण 1 (107.8), खंडाळा 5.4 (148.4 ), वाई 13.8 (230.3), महाबळेश्वर 88.7 (1886), तर सरासरी 381.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.