‘रमाई’ घरकुलांसाठी ३६ कोटी

‘रमाई’ घरकुलांसाठी ३६ कोटी

सातारा - रमाई आवास योजनेसाठी (ग्रामीण) सातारा जिल्ह्यास २०१७-१८ साठी केवळ ३०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाचे गतिमान कामकाज, वाढीव मागणीसाठी केलेला पाठपुराव्यामुळे समाजकल्याण आयुक्‍तांनी हे उद्दिष्ट तब्बल तीन हजार घरकुलांचे दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेघरांना तब्बल ३६ कोटींचा फायदा होणार आहे. 

पंतप्रधान आवास, रमाई, शबरी योजनेतून घरकुले उभारण्यात सातारा जिल्ह्याने देशात नावलौकिक मिळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या मे महिन्यात जिल्ह्यात आले असताना त्यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा गौरव करत वाढीव मागणी केल्यास अनुदानाला मंजुरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. चालू आर्थिक वर्षात मात्र ‘रमाई’साठी केवळ ३०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी समाजकल्याण आयुक्‍तालयाकडे पाठपुरावा केल्याने हे उद्दिष्ट तब्बल २७०० कुटुंबांचे वाढवून आल्याने चालू आर्थिक वर्षात ‘रमाई’तून तीन हजार घरकुले उभारता येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यास ३६ कोटींच्या अनुदानाचा लाभ होईल. 

रमाई योजनेत प्रती घरकुलासाठी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शिवाय घरकुलाच्या लाभार्थ्याने अकुशलचे काम केल्यास रोजगार हमी योजनेतून ९० दिवसांच्या मजुरीपोटी १८ हजार व शौचालय नसल्यास ते बांधण्यासाठी स्वच्छ भारत अभियानमधून १२ हजारांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे घरकुल बांधणे सोयीचे ठरत असते, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातून देण्यात आली. 

योजनेच्या अटी
कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असल्याचा तहसीलदारांचा दाखल, अनुसूचित जाती प्रवर्गाचा दाखला, १५ वर्षे महाराष्ट्रातील रहिवाशी दाखला, ग्रामसभा शिफारस, पंतप्रधान आवास योजनेच्या ‘ड’ यादीत नाव आवश्‍यक, जागा असल्याबाबतचा उतारा, कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नावाने यापूर्वी घरकूल लाभ घेतलेला नसावा, पक्‍के घर नसावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com