रामराजेंना सभापतिपदावरून हटवावे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

""यशोदीप पतसंस्थेत गैरव्यवहार झाला असता, तर 2009 ते 2015 या वर्षात मला शिक्षा झाली असती. केवळ वसुली होत नाही इतकाच दोष आहे.'' 
डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार 

सातारा - यशोदीप पतसंस्थेची सूडबुद्धीने चौकशी लावून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आजपर्यंत माझी राजकीय कारकिर्द उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या रावणी प्रवृत्तीच्या माणसाला सभापतिपदावरून हटवावे, अशी मागणी आपण राज्यपालांकडे केल्याची माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, फलटण तालुक्‍यातील खासगी सावकारीचे मूळ त्यांच्या घरातूनच सुरू होत असून, यासंदर्भात ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील मोठे नेते एकमेकांची उणीदुणी काढून एकमेकांना त्रास देण्याचे काम करत आहेत. शेजारच्या सांगली जिल्ह्यातील नेते मात्र, जिल्ह्याच्या प्रश्‍नांवर मतभेद विसरून एकत्र येत आहेत, असे सांगून डॉ. येळगावकर म्हणाले, ""जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला, तर त्याने योजनांना निधी देण्याऐवजी सुधारित प्रशासकीय मान्यता अडविल्या. सहकार, औद्योगिक विकास खुंटविला आहे. सध्या जिल्ह्यात रेडिमेड पुढारी खूप झाले असून, त्यांना सर्व काही रेडिमेडच लागते. त्यातूनही फलटणचा राजा चांगले काही तरी करेल, असे वाटत होते; पण त्यांनीही तीच प्रथा चालविली आहे. जिल्ह्याच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वांना एकत्र केले तरी त्यांचे कौतुक करू; पण त्यांनी सर्व नियम मोडून मतदारसंघ राहिला नाही म्हणून माणमध्ये उभे राहायचे म्हणून हा सर्व प्रकार सुरू केला आहे. यशोदीप पतसंस्थेची केवळ सूड बुद्धीने चौकशी लावली. दोष दुरुस्ती अहवाल देखील 2015 मध्ये आम्ही सादर केला होता. त्यामध्ये माझ्यावर एकही दोष नव्हता; पण जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातून हा अहवाल जाणीवपूर्वक गहाळ करून मायणीच्या रेबनवाल्याशी संगनमत करून यशोदीप पतसंस्थेवर पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी टाकली. मात्र, सुदैवाने ही लक्षवेधी चर्चेला आली नाही. सभापतींनी केवळ राजकीय सूडबुद्धीने 12 सप्टेंबरला त्यांच्या दालनात बैठक बोलावून मला त्रास देण्याच्या भावनेतून कार्यवाही करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.'' त्यांचा हा बैठका लावण्याचा प्रकार विधान परिषदेच्या प्रथा परंपरेत बसतो का, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

प्रत्येक दोन वर्षांनी चौकशी लावणे व माझी बदनामी करणारा हा "रामराजा' नाही तर "रावण राजा' आहे, अशीही टीका त्यांनी केली. स्वत:च्या सर्व संस्था बुडविल्या. त्यांची सभापती पदावर राहण्याची पात्रता नाही. अलीकडे नवीन प्रकार उघडकीला आला आहे. अवैध सावकारीचा धंदा त्यांच्या घरातूनच सुरू आहे. यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे तक्रार केली आहे. बेकायदेशीर खासगी सावकारीप्रकरणी आम्ही रामराजेंची ईडीकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे. भुजबळानंतर फलटणच्या निंबाळकर घराण्याचा नंबर लागतो. त्यामुळे या हीन प्रवृत्तीच्या माणसाला सभापतिपदावरून हाकलावे, अशी मागणी मी केली असून, प्रसंगी आंदोलन करण्याचीही तयारी ठेवली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.