पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप 

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप 

सातारा - साताऱ्यात गाजलेल्या रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. ए. ढोलकिया यांनी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. माहेरहून सोने आणण्यासाठी त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला होता. भरत कांतिलाल ओसवाल (वय 31, रा. गुलमोहर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे त्याचे नाव आहे. 

लग्नापूर्वी रिंकूच्या माहेरच्यांनी 16 तोळे सोन्याचे दागिने देण्याचे मान्य केले होते. मात्र, लग्नावेळी त्यांनी आठ तोळे दागिने घातले. उर्वरित दागिने माहेरहून आणण्यासाठी भरत तिचा छळ करत होता. लग्नाला दोन-तीन वर्षे झाली तरी मूल होत नसल्यावरूनही तो वाद घालत होता. 19 ऑक्‍टोबर 2014 रोजी रात्री रिंकूला बहिणीचा फोन आला. तेवढ्यात भरत तेथे आला. त्यामुळे तिने फोन कट केला. जेवण झाल्यावर दोघांत वाद झाला. त्यात त्याने तिचा गळा आवळला. त्यात रिंकू बेशद्ध पडली. रात्री साडेबाराच्या सुमारास भरतने रिंकूला उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले होते. 

रिंकूच्या मृत्यूविषयी शंका वाटल्याने जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रिंकूच्या गळ्यावरील खुणा पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी रिंकूच्या माहेरच्यांना सांगितले. त्यानंतर नातेवाईक साताऱ्यात आले. शवविच्छेदनानंतर तिचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. 

रिंकूची आई चंदा यांच्या फिर्यादीनुसार भरतवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक पांढरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तब्बल पावणेदान वर्षे खटल्याचे कामकाज सुरू होते. या दरम्यान, वैद्यकीय अधिकारी, रिंकूची आई, काका यांच्यासह 11 जणांच्या साक्षी झाल्या. साक्षीदारांच्या साक्षी, परिस्थितीतजन्य पुरावे व सहायक सरकारी वकील महेश कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्या. ढोलकिया यांनी भरतला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना पोलिस प्रॉसिक्‍यूशन स्कॉडचे उपनिरीक्षक पी. के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी, रिहाना शेख यांनी सहकार्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com