रस्त्यावरील प्रवास सुरक्षितच व्हायला हवा

रस्त्यावरील प्रवास सुरक्षितच व्हायला हवा

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत हेल्मेटची सक्ती करण्याचा घेतलेला निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह आहे. वाढती वाहने, अपघातांचे प्रमाण, मृत्यू किंवा गंभीर दुखापती, जायबंद होण्याचे प्रमाण हे सारे पाहिले तर अशा पद्धतीच्या निर्णयाची गरज होतीच. निर्णय होतो, अंमलबजावणीचे काय, असा प्रश्‍न नंतर उदभवतो, तरीही निर्णय घेतला हे महत्त्वाचे आहे. वाहतूक सुरक्षेमधील ‘हेल्मेट’ हा फक्त एक घटक आहे; रस्त्याशी निगडीत इतर अनेक घटकांबाबतही यानिमित्ताने विशेषत: पोलिस प्रशासनाने विचार करणे आवश्‍यक आहे. 

रस्त्यावरची सुरक्षा हा विषय दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत चालला आहे. देशासाठी, चांगले काम करताना मृत्यू आला तर अभिमान वाटतो; पण रस्त्यावर मृत्यू आला तर तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त होते. नंतर सारे विसरून जातात. रस्त्यावरचे बळी म्हणजे सार्वजनिक व्यवस्थेचे बळी ठरतात. विनाकारण जीव जाण्याचे हे प्रमाण कमी व्हायला हवे. त्यासाठी मूलभूत विचार करून उपायांची अंमलबजावणी करायला हवी. हेल्मेट हा त्यातील व्यक्तिगत सुरक्षेसाठी करावयाची उपाययोजना आहे. सार्वजनिक सुरक्षेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रस्ता शहरातील असो, राज्य रस्ता असो की महामार्ग. या रस्त्यांची अवस्था लक्षात घेतली, तर किती असुरक्षित वातावरणात प्रवास सुरू असतात, हे लक्षात येते. आपल्याकडील रस्ते तयार करण्याची पद्धत अनेकदा सदोष असते. शहरात रस्ते बनविताना तो दर वर्षी कसा बनेल, याकडेच अधिक लक्ष दिले जाते. रस्ता डांबरी करतात; परंतु कडेला गटारांची व्यवस्था नसल्याने ते दर वर्षी बाद होतात. मग प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार मिळून त्या रस्त्याचे व्यवस्थापन करतात. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबद्दल साशंकता असते. त्याशिवाय रस्त्यावरील अतिक्रमणे हा विषयही वाहतुकीला धोकेदायक ठरतो. ती अतिक्रमणे दूर करण्यातही प्रशासन वेळोवेळी अपयशी ठरते. रस्त्यावरील खड्डे, साइडपट्ट्या, गरज नसताना अशास्त्रीय पद्धतीने बनविलेले स्पीडब्रेकर या गोष्टींकडे प्रशासनातील कोणाही जबाबदारीने लक्ष देत नाहीत. वाहनांचा वेग तुलनेत कमी असला तरी शहरात वाहनचालकांचे लक्ष वेधणारे फ्लेक्‍सचे बोर्ड, चौकाचौकातील अनियंत्रित वाहतूक, सदोष सिग्नलव्यवस्था, पार्किंगची अडचण, थांबे सोडून अस्ताव्यस्त उभ्या असणाऱ्या रिक्षा या साऱ्या गोष्टी वाहतूक व्यवस्थेतील अडसर असतात. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी असणारे पोलिस अवतीभवती असले, तरी हे प्रकार सुरू राहतात. वाहतुकीतील या त्रुटीही दूर करून रस्ता सुरक्षित करता येऊ शकतो. शहरापेक्षा राज्य मार्ग आणि महामार्गावरील वाहतुकीतील सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. कारण या रस्त्यावरील वाहने वेगात असतात. इथे हेल्मेटची सक्ती करायलाच हवी. त्याचबरोबर दर्जेदार रस्ते, योग्य पद्धतीने केलेल्या साइडपट्ट्या, धोक्‍याची सूचना देणारे फलक अशा बाबींची पूर्तता करणे प्रशासनाचे काम आहे. हेल्मेटची सक्ती झालीच तर अशा किरकोळ वाटणाऱ्या; परंतु रस्ता सुरक्षेत महत्त्वाच्या असणाऱ्या बाबींकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष द्यायला हवे, अशी लोकांची अपेक्षा आहे.  

सायकलवरून केलेली वारी असो, की आता घेतलेला हेल्मेटचा निर्णय असो. विश्‍वास नांगरे- पाटील नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले आहेत. त्यांनी यापूर्वी साताऱ्यातील फूटपाथवरील अतिक्रमण काढण्याबाबतचा निर्णयही असाच जाहीर केला होता. त्याचे पुढे काय झाले, याबाबत आता चर्चा न केलेली बरी; पण ही अतिक्रमणे दूर करणे हासुद्धा वाहतूक व्यवस्थेत सुधार करण्याचाच भाग होता. आहे. पोलिस महानिरीक्षकांनी हा निर्णय घेतला. तो घेताना या रस्ता सुरक्षेच्या इतर गोष्टींकडेही प्राधान्यक्रमाने लक्ष दिले, तर वाहतूक सुरक्षित होण्याच्या दिशेने प्रवास झाला तर तो लोकांना हवा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com