चित्रपट रसिकांअभावी ‘समर्थ’ची एक्‍झिट!

सातारा - चित्रपट रसिकांच्या गर्दीने फुलून जाणारा प्रतापगंज पेठेतील हा ‘समर्थ टॉकीज’ परिसर आता रितारिता भासत आहे.
सातारा - चित्रपट रसिकांच्या गर्दीने फुलून जाणारा प्रतापगंज पेठेतील हा ‘समर्थ टॉकीज’ परिसर आता रितारिता भासत आहे.

सातारा - मुकद्दर का सिकंदर, शराबी, क्रांतीपासून हीरो, मिस्टर इंडिया, अंधा कानून, राजा हिंदुस्थानी आणि अगदी अलीकडच्या सैराटपर्यंत या चित्रपटगृहाने चंदेरी दुनियेतील सुवर्णकाळ अनुभवला. गुरुवारी दुपारी तीनचा ‘जगावेगळी अंत्ययात्रा’ या चित्रपटाचा खेळ ‘समर्थ’चा अखेरचा खेळ ठरला. सात प्रेक्षकांच्या साक्षीने या ‘खेळा’ची सांगता झाली. त्यानंतर ‘समर्थ’चा पडदा पडला तो कायमचाच! 

कालच चित्रपटगृहाचा पडदा, साउंडसिस्टिम, प्रोजेक्‍टर, डिजिटल यंत्रणा आदी किमती साहित्य चित्रपटगृहमालकांनी अन्यत्र हलविले. थिएटर बंद करण्यात येत असल्याचे ‘समर्थ’चे मालक प्रकाशशेठ चाफळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. साताऱ्यात पूर्वी सात चित्रपटगृहे होती. प्रथम प्रभात (गुरुवार परजासमोर), पाठोपाठ चित्रा (यादोगोपाळ पेठ), मग कृष्णा (जुना मोटारस्टॅंड), जय-विजय (२००८), राधिका (डिसेंबर २०१५) ही चित्रपटगृहे बंद पडली. गेल्या काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या ‘समर्थ’नेही अखेर मान टाकली! साताऱ्यातील सातपैकी सहावे चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेले. 

‘समर्थ’चे पूर्वीचे नाव ‘आनंद’ होते. प्रतापगंज पेठेत, हमरस्त्याला लागून असलेल्या वाड्याच्या इमारतीत हे चित्रपटगृह चालायचे. नंतर बंद पडलेले चित्रपटगृह ट्रस्टी कंपनीकडून अप्पासाहेब व बापूसाहेब या चाफळकर बंधूंनी चालवायला घेतले. १७ जुलै १९७९ रोजी ‘मुकद्दर का सिकंदर’ हा पहिला चित्रपट नव्या ‘समर्थ’ बाहेर झळकला.

राजवाड्यापासून हाकेच्या अंतरावर ही सर्व चित्रपटगृहे होती. राजवाडा हे पूर्वी शहराचे मध्यवर्ती व मुख्य बाजारपेठेचे केंद्र होते. ‘जय-विजय’ काय ते एवढे एकच थोडे लांब होते. करमणुकीची फारशी साधने नव्हती. ८५-८७ नंतर दूरदर्शनचा प्रसार वाढला. अशा काळात थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे हाच रसिकांपुढे पर्याय असायचा. त्यामुळे ग्रामीण भागातील रसिक रविवार- गुरुवारी, तसेच सुटीच्या इतर दिवशी, सणासुदीनिमित्त शहरात चित्रपट पाहायला येत. रविवारी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चित्रपट पाहायला जाण; मध्यंतरात ‘समर्थ’लगत ‘युनिक’ कोल्ड्रिंक्‍समध्ये सोडा पिणे हा सातारा व पंचक्रोशीतील नागरिकांचा शिरस्ता होता. 

अमिताभचा शराबी, अंधा कानून, मनोजकुमार- दिलीपकुमारचा क्रांती, हिरो, राजा हिंदुस्तानी... अशा एक ना अनेक चित्रपटांचे फलक तब्बल २५ आठवडे ‘समर्थ’वरून उतरले नाहीत. गेल्या चार- पाच वर्षांत मात्र चित्रपटगृह व्यवसायाला उतरती कळा लागली. ‘समर्थ’ने तर प्रेक्षकांअभावी सायंकाळी सहा व रात्री नऊचे प्रयोग महिन्याभरापासून बंदच ठेवले होते. सुमारे सव्वासहाशे प्रेक्षक क्षमता असलेल्या या चित्रपटगृहात ५० प्रेक्षकांच्या साक्षीने काल दुपारी १२ चा ‘बबन’ या चित्रपटाचा खेळ झाला. दुपारी तीन वाजता सात प्रेक्षकांच्या साक्षीने झालेला ‘जगावेगळी अंत्ययात्रा’चा खेळ ‘समर्थ’मध्ये अखेरचा ठरला. चित्रपटगृहाची इमारती जीर्ण झाली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे थिएटर जाऊन त्याठिकाणी टोलेजंग इमारत उभी राहील. त्यात एखादे मिनी थिएटरही भविष्यात होऊ शकते. तथापि, मनात घर करून राहिलेल्या ‘समर्थ’च्या आठवणी इतक्‍या सहजी पुसल्या जाणार नाहीत, हे मात्र नक्की !

पूर्वी तो वाडा होता. १९७८ मध्ये आम्ही नूतनीकरण करून ‘समर्थ’ सुरू केले. आता ही इमारत जीर्ण झाली आहे. नियमांतील सुधारणांमुळे या जागेवर नव्याने बांधकाम करता येत नाही आणि वारंवार सुधारणा करण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे नुकसानीपोटी आम्ही चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवर सध्यातरी कोणतेही नियोजन नाही.
- प्रकाशशेठ चाफळकर, मालक, समर्थ चित्रपटगृह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com