रस्त्यात अस्वच्छता आहे?...क्‍लिक करा! 

रस्त्यात अस्वच्छता आहे?...क्‍लिक करा! 

सातारा - सार्वजनिक ठिकाणी जनावर मरून पडलंय, गटार तुंबलंय, कचराकुंडी भरून वाहते आहे... हे चित्र शहरात दिसताच केवळ एका क्‍लिकवर तुमची तक्रार आता पालिकेच्या आरोग्य यंत्रणेपर्यंत पोचणार आहे. शिवाय तुमच्या तक्रारीचे निवारण 24 ते 48 तासांत होणार आहे. याकरिता शासनाने विकसित केलेले "स्वच्छता ऍप' डाऊनलोड केले, की झालं काम! या ऍपमुळे सातारा शहराने देशातील रॅंकिंगमध्ये 213 वा क्रमांक पटकावला आहे. 

नागरी स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता ऍपपासून सर्वसामान्य नागरिक अद्याप दूर राहिला, अशी जिल्ह्यातील विविध शहरांत परिस्थिती आहे. इतर पालिकांच्या तुलनेत साताऱ्याने हा ऍप लोकांपर्यंत पोचविण्यात आघाडी घेतली आहे. या कामगिरीच्या जोरावर सातारा पालिकेचे रॅंकिंग देशात 213 पर्यंत आले आहे. साताऱ्यासह जिल्ह्यातील सर्वच पालिकांना नजीकच्या काळात अधिक काम करावे लागणार आहे. स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरी भागात स्वच्छताविषयक जागरूकता वाढविण्यासाठी शासनाने स्वच्छता हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. 

सातारा पालिकेतील स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे समन्वयक विशाल सुर्वे यांनी सांगितले, ""गुगल प्ले स्टोअरवरून हे ऍप डाऊनलोड करता येते. डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलधारकाने भाषा निवडून स्वत:चा मोबाईल क्रमांक नोंदवायचा. "ओटीपी' नंबर तपासल्यानंतर आपल्या शहराचे लोकेशन नोंदवावे लागते. त्यानंतर हे ऍप सक्रिय होते. आपल्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असल्यास या मोबाईल ऍपद्वारे छायाचित्र काढून पालिकेकडे पाठवायचे आहे. भटके मृत जनावर आढळणे, कचराकुंडी भरून वाहने, सार्वजनिक स्वच्छतागृहाची अस्वच्छता आदी नऊ प्रकारांमध्ये येणाऱ्या तक्रारींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आलेल्या प्रत्येक तक्रारीचे 24 ते 48 तासांत निवारण करण्याची पालिकेची जबाबदारी आहे.'' 

सातारा पालिकेंतर्गत 616 नागरिकांनी हे ऍप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे. या ऍपच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरात 97 तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या. त्यापैकी 94 तक्रारींचे निराकरण पालिकेमार्फत करण्यात आले. पाच तक्रारींबाबत कार्यवाही सुरू असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. देशातील चार हजार 41 शहरांमध्ये स्वच्छताविषयक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याची तयारी पालिकास्तरावर सुरू झाली आहे. देशात सातारा पालिका 213 क्रमांकावर आहे. स्वच्छताविषयक जागृती, प्रत्यक्ष काम वाढत जाईल, तसे त्या पालिकेला वरचे मानांकन मिळत जाते, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील पालिकांचे रॅंकिंग  
स्वच्छता ऍपचा प्रसार, नागरिकांकडून त्याचा होणारा वापर आणि पालिकेकडून होणारे निराकरण याच्या प्रमाणावर प्रत्येक शहराचे देशातील मानांकन ठरविले जाते. त्यानुसार विविध पालिकांचे रॅंकिंग पुढीलप्रमाणे ः 
फलटण -654 
कऱ्हाड - 224 
वाई -419 
रहिमतपूर -593 
महाबळेश्‍वर - 295 
पाचगणी -265 
म्हसवड - उपलब्ध नाही 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com