सातारा जिल्ह्यातील 106 शाळांच्या इमारती धोकादायक 

विशाल पाटील
रविवार, 3 सप्टेंबर 2017

शाळा व त्यातील खराब खोल्या 
कऱ्हाड तालुक्‍यातील 32 शाळांतील 150 खोल्या खराब असून, त्यात बनवडी, उंब्रज मुले, वनवासमाची, पाल, पेंबर, पेरले या शाळांतील आठ ते नऊ खोल्या धोकादायक आहेत. पाटणमधील 13 शाळांतील 36 खोल्या, खटावमधील 17 शाळांतील 41 खोल्या, जावळीतील आठ शाळांतील 24 खोल्या, फलटणमधील 13 शाळांतील 24 खोल्या, महाबळेश्‍वरातील दोन शाळांत दोन खोल्या, वाईतील तीन शाळांतील तीन खोल्या, खंडाळ्यातील आठ शाळांतील 31 खोल्या, साताऱ्यातील चार शाळांतील 12 खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. 

सातारा : प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्‍कम असेल, तर आयुष्याची घडी बसते, असे म्हटले जाते. मात्र, प्राथमिक ज्ञानदान करणाऱ्या इमारतींचाच पाया आता भक्‍कम राहिलेला दिसत नाही. तब्बल 106 प्राथमिक शाळांच्या 340 खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, आवश्‍यकतेच्या प्रमाणात तोकडा निधी प्राप्त होत असल्याने विद्यार्थ्यांचे जीवनमान धोक्‍यात आहे. 

नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा स्लॅब कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने जिल्हा परिषद शाळांचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले. जीर्ण भिंती, गळके छत, भिंतीला तडे, खराब पत्रे, खराब दारे अशी विदारक स्थिती अनेक शाळांची असते. सातारा तालुक्‍यातील कुशी येथील शाळेतील भिंती जीर्ण होऊन कोसळल्याने जिल्ह्यातील शाळांची परिस्थिती पुढे आली आहे. तब्बल 106 शाळांच्या इमारतीमधील 340 खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. त्यात कऱ्हाड तालुक्‍यातील सर्वाधिक 32 शाळांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपुढे खासगी, इंग्लिश मीडियम शाळांचे आव्हान असून, ते पेलणे शाळांना अडचणीचे ठरत आहे. खासगी शाळांमधील पायाभूत सुविधा पालक, विद्यार्थ्यांना भुरळ घालत असतात. मात्र, जिल्हा परिषदेतील अनेक शाळांना पायाभूत सुविधा नसल्याने त्या शाळा खासगी शाळांच्या आव्हानापुढे टिकू शकत नाहीत. जिल्हा नियोजन समिती, सेस फंड, सर्व शिक्षा अभियानातून बांधकामासाठी निधी दिला जातो. मात्र, हा मागणीच्या तुलतेन तोकडा असल्याने बांधकामे होत नाहीत. जिल्हा नियोजन समितीतून चार कोटी 63 लाखांची मागणी असून, त्यात दोन कोटी मंजूर झाले आहेत. त्यातील एक कोटी प्राप्त झाले असून, 25 बांधकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. सर्व शिक्षा अभियानातून दोन कोटी निधी मिळण्याची अपेक्षा शिक्षण विभागाला आहे. मात्र, आवश्‍यकतेच्या प्रमाणात हा निधी कमी असल्याने वरिष्ठ स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहेत. 

शाळा व त्यातील खराब खोल्या 
कऱ्हाड तालुक्‍यातील 32 शाळांतील 150 खोल्या खराब असून, त्यात बनवडी, उंब्रज मुले, वनवासमाची, पाल, पेंबर, पेरले या शाळांतील आठ ते नऊ खोल्या धोकादायक आहेत. पाटणमधील 13 शाळांतील 36 खोल्या, खटावमधील 17 शाळांतील 41 खोल्या, जावळीतील आठ शाळांतील 24 खोल्या, फलटणमधील 13 शाळांतील 24 खोल्या, महाबळेश्‍वरातील दोन शाळांत दोन खोल्या, वाईतील तीन शाळांतील तीन खोल्या, खंडाळ्यातील आठ शाळांतील 31 खोल्या, साताऱ्यातील चार शाळांतील 12 खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. 

या शाळा वापरण्यास धोकादायक 
कऱ्हाड : केसे, पेरले, आगाशिवनगर नंबर दोन, जखीणवाडी, रेठरे खुर्द, वनवासमाची, माटेकरवाडी, शेणोली मुले, शेणोली मुली, वाघेरी, पाल, पेंबर, येळगाव, मुंढे, कोणेगाव, चरेगाव, वडोली भिकेश्‍वर, नांदलापूर, उंब्रज मुले, शामगाव, सुपने, वाघेरी, बेलवाडी, पाडळी- हेळगाव, कोरेगाव, चिखली, करवडी, म्होर्पे, इंदोरी, वाजेवाडी, शिवडे, बनवडी. 
खटाव : वर्धनगड, शेळकेवाडी, काटकरवाडी, हिंगणे, तडवळे, चिंचणी, मांजरवाडी, गणेशवाडी, विसापूर, जांभ, लक्ष्मीनगर, चितळी, धारपुडी, बुधव, नायकाचीवाडी, बिटलेवाडी. 
पाटण : गारवडे, नावडी, शितपवाडी, पाचगणी, केळोली नंबर एक, मनेरी, वाघळवाडी, सोनवडे, नारळवाडी, मठवडी, गावडेवाडी, आचरेवाडी, मल्हारपेठ. 
फलटण : आसू, तरडगाव, नांदल, हणमंतवाडी, वेळोशी, श्रीरामवाडी- सोनवडी बुद्रुक, मिऱ्याचीवाडी, पालवेवस्ती-राजुरी, काळज, हिंगणगाव, पाडेगाव. 
खंडाळा : चाहुरवस्ती, वाठार बुद्रुक, बिरोबावस्ती, लोणंद मुले एक, बाळुपाटलाचीवाडी, जाधववस्ती, होडी, अतिट. 
जावळी : दरेखुर्द, महिगाव, बिभवी, गवडी, दिवदेव, महू, जरेवाडी, आखेगनी. 
माण : मार्डी नंबर एक, मोगराळे, भालवडी, घोडेवाडी, वरकुटे-मलवडी. 
महाबळेश्‍वर : कळमगाव, कोट्रोशी. 
वाई : न्हाळेवाडी, खडकी, आसरे. 
सातारा : जैतापूर, वर्ये, कुशी, वाढे. 
 

Web Title: Satara news school buildings condition