कोठी पूजनाने ‘श्रीं’च्या महोत्सवास प्रारंभ

कोठी पूजनाने ‘श्रीं’च्या महोत्सवास प्रारंभ

गोंदवले - श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या १०४ व्या पुण्यतिथी महोत्सवाला आज (सोमवारी) पहाटे मंगलमय वातावरणात कोठी पूजनाने प्रारंभ झाला. या वेळी राज्य- परराज्यांतील भाविक उपस्थित होते. श्रींच्या समाधी दर्शनाबरोबरच कोठी पूजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या रचनेतून साकारलेली आरास पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरवात केली. हा महोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी घालून दिलेल्या रितीनुसारच येथील समाधी मंदिर समितीतर्फे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमीपर्यंत श्रींचा पुण्यतिथी महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. आज पहाटे कोठी पूजनाने श्रींच्या १०४ व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला. 

समाधी मंदिर परिसरातील मुख्य सभामंडपात सकाळी साडेसहा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसह श्री ब्रह्मानंद महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केले. समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे पूजन झाल्यानंतर अक्षय बटव्याचेही पूजन केले. त्यानंतर पुष्पमालांनी सजवलेल्या गोशाळेत गाईंचे तसेच कोठी पूजन केले. स्वयंपाकघरातही भट्ट्यांचे पूजन झाल्यानंतर आचाऱ्यांची लगबग सुरू झाली. मंदिर परिसरातील ध्यान मंदिरात आरती झाल्यानंतर भाविकांनी ध्यानस्थ होऊन एक माळ जप केला. कोठी पूजन कार्यक्रमानंतर मुख्य समाधी मंदिरात अखंड पहारा बसविला. कोठी पूजनानिमित्त यंदाही कोठीत विविध वस्तू, फळे, भाज्यांच्या वापरातून आकर्षक आरास केली होती. स्वयंपाकघरातही विविध लहानमोठी भांडी व वस्तू वापरून आकर्षक मांडणी केली होती. येथील केळीच्या पानाच्या पार्श्वभूमीवरील गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. आरास पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समाधी मंदिरात अखंड रामनाम, अखंड पहारा, समाधीस रुद्राभिषेक, श्री रामपाठ व श्री विष्णू सहस्त्रनाम, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.

आज सकाळी मयूर कोळेकर, भाग्यश्री घारपुरे, संपदा विपट, पंडित उपेंद्र भट, मनोज देसाई, श्रुती रामदासी, गौरी देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. सुरश्री भजनी मंडळ, चैतन्य भजनी मंडळ, सद्‌गुरू माउली भजनी मंडळ, शारदा भजनी मंडळ, दत्त प्रासादिक भजनी मंडळ, ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, स्वरांजली भजनी मंडळ, सिद्धिविनायक भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. सुनेत्रा कुलकर्णी, सुधाकर इनामदार, अनुराधा ओक यांचे कीर्तन झाले. या महोत्सवाची सांगता १२ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजून ५५ मिनिटांनी समाधीवर गुलाल-पुष्पांच्या उधळणीने होणार आहे. त्याच दिवशी १३ कोटी रामनाम जपाची सांगता व नवीन संकल्प करण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशीच वीज गायब
वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे आज पहिल्याच दिवशी महोत्सवाची सुरवात बहुतांशी भागात अंधारातच झाली. महोत्सवाच्या सांगतेपर्यंत वीज सुरळीत राहावी, अशीच अपेक्षा ग्रामस्थ व भाविकांमधून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com