चारभिंतीच्या पोटात झोपडपट्टीवासीयांचा जीव!

चारभिंतीच्या पोटात झोपडपट्टीवासीयांचा जीव!

सातारा - चारभिंतीकडे जाणाऱ्या घाटरस्त्याकडेच्या झोपडपट्टीच्या साम्राज्याला माळीणसारखा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी आज सकाळी दरड कोसळण्याचा प्रकार घडला. सुदैवाने त्यात मोठी हानी झाली नसली, तरी एक प्रकारे निसर्गाने दिलेला हा धोक्‍याचा इशाराच आहे. प्रशासनाने वेळीच सावधानता न बाळगल्यास या टेकडीच्या पोटात असलेल्या झोपडपट्टीवासीयांना इजा पोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

शाहूनगरमधील नागरिकांना सातारा शहरात येण्यास चारभिंतीचा घाटरस्ता हा जवळचा मार्ग आहे. आज सकाळी सात वाजण्यापूर्वी चारभिंतीलगतच्या टेकडीचा काही भाग सुटून खाली आला. त्यामुळे काही मोठे दगड घरंगळत खालच्या रस्त्यावर येऊन पडले. त्यातील काही दगड रस्त्याच्या कडेला, तर काही रस्ता ओलांडून दरीच्या बाजूपर्यंत गेले. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी हानी झाली नसली तरी या भागात राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या डोक्‍यावर धोका कायम घोंघावत आहे. 

चारभिंती टेकडीच्या पोटात (डोंगर पोखरून) गेल्या काही वर्षांत झोपडपट्टी उभी राहिली आहे. त्याचबरोबर टेकडीच्या पायथ्याला काही बंगलेही आहेत. दरड कोसळू नये म्हणून प्रशासनाने आवश्‍यक काळजी घेतली पाहिजे. अन्यथा या ठिकाणी भविष्यात दरड कोसळण्याचे प्रकार वाढतील. कोसळलेले हे दगड वेगात खाली आल्यास ते झोपडपट्टीवर कोसळण्याची शक्‍यता अधिक दिसते. आरसीसीमधील बंगल्यांना त्यांचा फारसा धोका नसला तरी कच्च्या साहित्यापासून उभ्या राहिलेल्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला त्यामुळे धोका  पोचू शकतो. 

जिल्हा प्रशासन किती गांभीर्याने घेणार?
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरीप्रमाणेच ग्रामीण भागात राहणाऱ्या व स्वत:चे घर नसणाऱ्या नागरिकांना घरकुले देण्याचे शासनाचे धोरण आहे. चारभिंती झोपडपट्टीही नगरपालिकेच्या हद्दीबाहेर आहे. निसर्गावर कोणाचेच नियंत्रण नाही. या ठिकाणी माळीणची पुनरावृत्ती घडू शकते. त्रिशंकू भागात असलेल्या चारभिंती झोपडपट्टीवासीयांचे शहरी योजनेप्रमाणे अन्यत्र घरकुले देऊन पुनर्वसन करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन हा प्रश्‍न किती गांभीर्याने हाताळते, यावर या झोपडपट्टीवासीयांचे भवितव्य अवलंबून आहे. 

अवजड यंत्रांच्या कंपनामुळे खडकस्तर ठिसूळ
डोंगरात रस्त्याचे काम करताना ब्रेकर, डोझर अशा कंपन पावणाऱ्या अवजड यंत्रसामग्रींचा वापर केला जातो. या यंत्रांच्या कंपनामुळे जमिनीच्या अंतर्गत भागात अनेक बदल घडतात. जमिनीअंतर्गचा खडकस्तर ठिसूळ होतो. पावसाळ्यात त्यात पडणारे पाणी जमिनीतून बाहेर यायला वाट शोधते. अशा वेळी दरड कोसळते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com