‘झेडपी’त उजळणार सौरऊर्जेचा प्रकाश!

विशाल पाटील
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

सातारा - जिल्हा परिषदेत वीज बिलापोटी प्रतिमहिना लाखांत खर्च येत असतो, तो कमी करण्यासाठी अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार यांनी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्याची संकल्पना मांडली आहे. त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूदही केली आहे. आता त्याला सर्वसाधारण सभेच्या मान्यतेची औपचारिकता बाकी आहे.

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबर खर्चातही बचत करण्यासाठी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जिल्हा परिषदेची इमारत चार मजली असून, त्या परिसरातील मोठी इमारत आहेत. आजपास जिल्हा बॅंकेशिवाय इतर कोणतीही मोठी इमारत नाही. ही इमारत पूर्व-पश्‍चिम अशी असल्याने सूर्यप्रकाशही जास्त असतो. टेरेसही मोठे असल्याने मोठ्या क्षमतेचे सौरऊर्जा युनिट बसविणे सहज शक्‍य आहे. या जमेच्या बाजूंचा विचार करून श्री. पवार हे सौरऊर्जेसाठी आग्रही आहेत.

सौरऊर्जा युनिट बसविल्याने त्यातून निर्माण झालेली वीज सर्व विभागांत वापरली जावू शकते. त्यातून विविध विभागांसाठी येणारे महिना काही हजारोंचे बिल अत्यंत कमी होईल. तसेच जादा वीजनिर्मिती झाल्यास ती वीज वितरणलाही विकता येईल. त्यातून अधिकचा नफा मिळेल. शिवाय, हे युनिट बसविणाऱ्याकडे पाच वर्षांसाठी देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही देण्यात येईल. 

जिल्हा परिषदेचा पुरवणी अर्थसंकल्प चार ऑक्‍टोबरच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. त्या अर्थसंकल्पात यासाठी ५० लाखांची तरतूद केल्याची खात्रीशीर माहिती आहे. या सभेत त्याला मान्यता मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्याची, तसेच बचतीचा मार्ग सुरू होण्याची शक्‍यता आहे. हे युनिट पूर्ण झाल्यास सातारा जिल्हा परिषद पुन्हा एकदा आदर्शवत ठरेल.