ती आली अन्‌ सारा भवताल टाकला व्यापून!

सातारा - ‘अश्‍वमेध गप्पा’ कार्यक्रमात गप्पा मारताना स्पृहा जोशी.
सातारा - ‘अश्‍वमेध गप्पा’ कार्यक्रमात गप्पा मारताना स्पृहा जोशी.

सातारा - ती पडद्यावर जितकी सहज वावरते, तितकीच ती कवितेच्या प्रांतातही सहज मुशाफिरी करते. ती सहज आली आणि सारा भवतालच तिने व्यापून टाकला. निमित्त होतं... येथील स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या ‘अश्वमेध गप्पां’चे. कवयित्री अभिनेत्री स्पृहा जोशी गप्पांमधून ‘रिल आणि रिअल’ असा रंजक प्रवास उलगडत होती. गझलनवाज भूषण कटकर यांनी मुलाखतकार म्हणून सहज संवाद साधत सातारकरांची संध्याकाळ ‘स्पृह’णीय बनवून टाकली. 

अश्‍वमेध ग्रंथालय व वाचनालय आयोजित सुमिन चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ‘अश्‍वमेध गप्पा’ हा कार्यक्रम नुकताच स्वयंवर मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी स्पृहा जोशी बोलत होती. ती म्हणाली, ‘‘अभिनय व कविता या अपघातानेच सुरू झाल्या. विद्या पटवर्धन यांनी माझ्यातील अभिनेत्रीला ओळखले. अभिनय क्षेत्रात मी पूर्ण वेळ आहे. पण, तो माझ्याकडून करून घेतला जातो. अभिनयात खरा कस लागतो. पण, कविता लेखनात मला लहानपणापासून सहजता वाटत गेली. त्यामुळे कविता लेखनाचा कधीच मला ताण वाटला नाही.’’ अभिनेत्री स्पृहाने आपला ऑन स्क्रीन प्रवास सहज सोप्या शब्दात उलगडत नेला आणि स्पृहाच्या मनात दडलेली ‘कुहू’ सुध्दा तिने प्रेक्षकांसमोर प्रकट केली. 

चित्रपट व मालिका निर्मितीचे तंत्र आणि त्यात येणारे अनुभव स्पृहाने रसिकांसमोर मांडले. या प्रवासात डोकं शाबूत ठेवावे लागते. कारण प्रसिद्धीचा ताण फारसा सोसत नाही आणि मग त्याचे दुष्परिणाम समोर येतात. हे सांगताना स्पृहा म्हणाली, ‘‘मराठी चित्रपटात अनेक चांगले दिग्दर्शक आहेत. वीरेंद्र प्रधान, विनोद लव्हेकर, संजय जाधव ही मंडळी तुमच्याकडून उत्तमच काम करून घेतात.’’बाल कलाकारांचा यंत्रवत नाच हा चॅनेलच्या ‘टीआरपी’चा भाग आहे. ‘टीआरपी’चा राक्षस आमच्या डोक्‍यावर आहे. त्यामुळे दिग्दर्शकांनाही काही मर्यादा येतात. त्यामुळे मालिकांमधून निखळ विनोद थोडाच दिसतो. जे मला पटेल तेच मी दूरचित्रवाणीवर बघणार, ही सवय आपणच लावून घ्यावी. मराठीत नवनवीन विषयांचे प्रयोग होत आहेत. पण, मराठी प्रेक्षक चित्रपट बघायला थिएटरमध्ये जातात का? असा थेट सवाल स्पृहाने रसिकांना केला. 

जगदीश पवार यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र झुटिंग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र माने यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. शशिभूषण जाधव व डी. एम. मोहिते यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com