कारखान्यांची मोळी दिवाळीनंतर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सातारा - जेमतेम उसाची उपलब्धता व परतीच्या मॉन्सूनची भीती असल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने दिवाळीनंतरच सुरू होतील. या वर्षीचा हंगाम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात संपण्याची शक्‍यता आहे. सर्वच कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची रक्कम चांगली दिली आहे. आता   दिवाळीला दुसरा हप्ता देण्याची तयारी करत असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. 

सातारा - जेमतेम उसाची उपलब्धता व परतीच्या मॉन्सूनची भीती असल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने दिवाळीनंतरच सुरू होतील. या वर्षीचा हंगाम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात संपण्याची शक्‍यता आहे. सर्वच कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची रक्कम चांगली दिली आहे. आता   दिवाळीला दुसरा हप्ता देण्याची तयारी करत असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. 

यावर्षी गळितासाठी उसाची उपलब्धता जेमतेम आहे. तसेच साखरेची कमतरता भासण्याची भीती असल्यामुळे शासनाने ऑक्‍टोबरपासूनच कारखान्यांचे गळीत सुरू करावे, अशी अपेक्षा ठेवली आहे. पण, जिल्ह्यात उसाची उपलब्धता असली तरी सप्टेंबर, ऑक्‍टोबरमधील परतीच्या मॉन्सूनमुळे ऊस तोडणी व वाहतुकीवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी कारखान्यांचे गळीत साधारण दिवाळीनंतरच सुरू करण्याकडे कल राहतो. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी दहा ऑक्‍टोबरपासून गळीत सुरू करण्याची परवानगी सहकार आयुक्तांकडे मागितली आहे. पण, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांची मोळी दिवाळीनंतरच पडणार आहे. बाजारपेठेत साखरेची कमतरता निर्माण होऊन साखरेचे दर वाढू नयेत म्हणून शासनाने काही कारखान्यांना साखर आयात करण्याची परवानगी दिली आहे. त्यातून बाजारपेठेतील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न शासन करत आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर बहुतांशी सर्व कारखान्यांचे बॉयलर पेटतील. पण, प्रत्यक्ष गाळप हे दिवाळीनंतरच सुरू होईल. पण, त्यापूर्वी गेल्या हंगामातील दुसऱ्या हप्त्याचा प्रश्‍न आहे. तो दिवाळीत देण्याचा कारखान्यांचा कल आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील काही कारखान्यांनी पहिला हप्ता दोन हजार ८५० रूपयांपर्यंत दिला आहे. सह्याद्री कारखान्याने विक्रमी तीन हजार १०० रुपये दर दिला आहे. त्यानंतर कृष्णा कारखान्याने दोन हप्त्यात तीन हजार १०० पर्यंत मजल  मारली आहे. उर्वरित कारखाने अजूनही दोन हजार ५५० ते दोन हजार ८५० पर्यंत अडकून आहेत. आता हे कारखाने ‘सह्याद्री’चा विक्रम मोडीत काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील हंगामातील पहिला हप्ता ठरविताना राजकारण मधे न आल्यास यावर्षीही कारखाने चांगला दर देऊ शकतील, अशी परिस्थिती आहे. वाढलेल्या एफआरपीनुसार कमीत कमी तीन हजारांपर्यंत पहिला हप्ता जाऊ शकतो. साखरेचे दर पाहता मोठे कारखाने पहिल्या हप्त्यात चांगला दर देऊ शकणार आहेत.

दुसरा हप्ता ५०० रुपये हवा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीत काल साताऱ्यात मेळावा झाला. त्यामध्ये दुसरा हप्ता ५०० रुपयांपर्यंत जाहीर न केल्यास आंदोलन उभे करण्याचा इशारा संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.