'ऊसाचे पैसे न मिळाल्यास कारखान्यांविरोधात आंदोलन '

सचिन शिंदे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

संपुर्ण कर्जमाफी हा अजेंडाच 
​शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी द्यावी ही आमची पहिल्यापासुनची मागणी नसुन हा आमचा अजेंडाच आहे. सध्या सरकारकडुन कर्जमाफी जाहीर करुनही आॅनलाईन अर्ज भरुन घेतले जात आहेत. तरीही संपुर्ण कर्जमाफी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावोगावी जावुन शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी जनजागृती करुन आवश्यकता भासल्यास त्यासाठी आंदोलनाचीही तयारी ठेवली असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री. नलवडे यांनी सांगितले. 

कऱ्हाड : केंद्र शासनाने जाहीर केलेली ऊसाची एफआरपी आणि गाळपास गेलेल्या ऊसाचा दुसरा हप्ताही जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे एफआरपीएवढेही पैसे त्यांना मिळत नसतील तर संबंधित कारखान्यांविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवुन देवु अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी आज दैनिक सकाळशी बोलताना दिली.

स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. नलवडे यांनी आज दैनिक सकाळ कार्यालयाला भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. श्री. नलवडे म्हणाले, खासदार राजु शेट्टी यांनी माझ्या कामाची दखल घेवुन माझी जिल्हाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही अविरत कार्यरत राहु. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतीचे प्रश्न वेगळे आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बरोबर घेवुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेवु. सातारा जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती वेगळी आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस असताना दुसरीकडे पाण्यासाठी टॅंकर सुरु करावे लागतात. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांना न्याय देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. कऱ्हाड तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊसाचा दुसरा हप्ता द्यायला परवडतो. मग जिल्ह्यातील अन्य कारखान्यांना का परवडत नाही ? काही साखर कारखान्यांनी तर केंद्र शासनाने जाहीर केलेली उसाची एफआरपीही दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या घामाच्या दामाशी प्रतारणा करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे साखर कारखान्यांनी एफआरपी आणि दुसरा हप्ता तातडीने देणे आवश्यक आहे. त्याप्रश्नी कारखानदारांना जाग आणण्यासाठी लवकरच आंदोलन सुरु करणार आहोत. यंदा साखर कारखान्यांचा हंगाम लवकरच सुरु होईल. केंद्र शासनाने जी एफआरपी जाहीर केलेली आहे त्याहीपेक्षा जादा दर मिळावा ही आमची भुमिका आहे. खासदार शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ऊस परिषदेत त्यासंदर्भातील घोषणा केली जाईल. त्यानंतर तेवढा दर मिळावे यासाठीही त्यांच्यी मार्गदर्शनाखाली कार्यरत राहु.

संपुर्ण कर्जमाफी हा अजेंडाच 
शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी द्यावी ही आमची पहिल्यापासुनची मागणी नसुन हा आमचा अजेंडाच आहे. सध्या सरकारकडुन कर्जमाफी जाहीर करुनही आॅनलाईन अर्ज भरुन घेतले जात आहेत. तरीही संपुर्ण कर्जमाफी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावोगावी जावुन शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी जनजागृती करुन आवश्यकता भासल्यास त्यासाठी आंदोलनाचीही तयारी ठेवली असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री. नलवडे यांनी सांगितले.