वीरपत्नी स्वाती महाडिक आता लष्करात लेफ्टनंट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक जम्मू- काश्‍मीरमध्ये अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झाले. कर्नल महाडिक यांच्या पत्नी स्वाती या नेहमीच त्यांच्या समवेत लष्करी वातावरणात राहिल्या. त्यामुळे त्यांनाही लष्करी जीवनाची आवड होती.

सातारा : अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेल्या पतीच्या पार्थिवाच्या साक्षीने लष्करात जाऊन देशसेवाच करण्याचा संकल्प सोडणाऱ्या पोगरवाडी येथील वीर पत्नी स्वाती महाडिक या लेफ्टनंट झाल्या आहेत. शनिवारी (ता. नऊ) त्या लेफ्टनंट पदाची शपथ घेऊन लष्करी सेवेत दाखल होणार आहेत. 

पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक जम्मू- काश्‍मीरमध्ये अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झाले. कर्नल महाडिक यांच्या पत्नी स्वाती या नेहमीच त्यांच्या समवेत लष्करी वातावरणात राहिल्या. त्यामुळे त्यांनाही लष्करी जीवनाची आवड होती. पतीला हौतात्म्य आल्यावर पराक्रमी पतीचे लष्कारातून अपुरे राहिलेले देशसेवेचे कार्य लष्करात भरती होऊन पूर्ण करण्याचा संकल्प स्वाती महाडिक यांनी अनेक वेळा बोलून दाखविला होता. 

हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, तसेच लष्कारानेही त्यांना अधिकारी होण्याची संधी दिली. त्यानुसार ऑक्‍टोबर 2016 मध्ये स्वाती महाडिक चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमीत (ओटीए) प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी गेल्या 11 महिन्यांत खडतर प्रशिक्षण पूर्ण करत लष्कराच्या शिस्तीत स्वत:ला बांधून घेतले आहे. सेना आयुद्ध कोर (आर्मी ऑर्डनन्स कॉर्प) मध्ये त्या अधिकारी होणार असून, येत्या शनिवारी त्या लेफ्टनंटपदाची शपथ घेऊन लष्करी सेवेत दाखल होणार आहेत.