शिक्षक बदल्यांची आंधळी कोशिंबीर...

विशाल पाटील
मंगळवार, 25 जुलै 2017

सातारा - प्राथमिक शिक्षकांना बदली प्रक्रियेत २० शाळा निवडताना ती शाळा सेवा ज्येष्ठ शिक्षकाने मागितली आहे की नाही, हीच माहिती मिळत नसल्याने सध्या विशेष संवर्ग एक व दोनमधील शिक्षकांना ‘आंधळी कोशिंबीर’चा डाव खेळावा लागत आहे. सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी त्या शाळा पूर्वीच मागितल्या असल्यास २० पैकी एकही शाळा मिळणार नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय बदली होणार की नाही, त्या वेळी कोणती शाळा मिळणार, याची संदिग्धता असल्याने ‘भिक नको; पण कुत्रे आवरं’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने, तसेच सर्वसाधारण आणि अवघड क्षेत्र (दुर्गम- सुगम) असे वर्गीकरण करून प्रथमच ग्रामविकास विभागामार्फत बदली प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष संवर्ग एकमधील शिक्षकांनी त्यांची माहिती ऑनलाइन भरली असून, जिल्ह्यात आठ हजारपैकी सुमारे १२०० शिक्षकांनी या संवर्गातून माहिती भरल्याची चर्चा आहे. सध्या संवर्ग दोनमधील शिक्षकांना शुक्रवारपासून ते आज (ता. २५) दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. एकदा माहिती भरून झाल्यास त्यामध्ये कोणत्याही स्वरूपात बदल करता येणार नाही, तसेच बदलीसाठी २० शाळांची निवड करावी लागणार आहे. 

संवर्ग एकमधील शिक्षकांची बदली प्रथम होणार आहे. यातील बहुतांश शिक्षकांनी कुटुंबापासून अथवा शहरापासून जवळच्या शाळा मागितल्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे आता संवर्ग दोनमधील शिक्षकांना शाळा मागणे अडचणीचे होऊ लागले आहे. संवर्ग एकमधील शिक्षकांनी कोणत्या शाळा मागितल्या आहेत, याची माहिती जाहीर केली जात नसल्याने २० शाळांची निवड अंदाजे केली जात आहे. या शाळा निवडताना कोणत्या आधारावर निवडायच्या याची धास्तीही त्यांना वाटत आहे. ‘आंधळी कोशिंबीर’चा डाव खेळल्यास शाळा मिळेलच याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पुढे प्रशासकीय बदलीला सामोरे जावे लागणार का? तसे झाल्यास पुन्हा अपेक्षित नसलेल्या शाळेवर जावे लागेल. बदल्या स्वीकारल्यास लांबच्या शाळा मिळाल्यास कौटुंबिक घडी विस्कटेल, या भीतीने ‘भीक नको; पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची वेळही या संवर्गातील शिक्षकांवर आली आहे. 

विशेष संवर्ग एकमध्ये कोण...
पक्षघाताने आजारी, अपंग कर्मचारी, मतिमंद, अपंग मुलांचे पालक, हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, जन्मापासून एकच किडनी, डायलेसीस सुरू असलेले, कॅन्सर, मेंदूचे आजार, आजी- माजी सैनिक, अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा, कर्मचारिका कर्मचारी, परित्यक्‍त्या/ घटस्फोटित महिला, ५३ वर्षे वय पूर्ण, स्वातंत्र्यसैनिकांची (हयात) मुले, नातवंडे असलेले कर्मचारी आदी कर्मचारी विशेष संवर्ग एकमध्ये मोडतात. 

विशेष संवर्ग दोनमध्ये कोण...
पती-पत्नी एकत्रीकरणात पती- पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी, दोघांपैकी एक जिल्हा परिषद आणि दुसरा केंद्र किंवा राज्य शासनाचा, शासनाच्या स्वायत्त संस्थेतील, केंद्र, राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील, तसेच शासनमान्य संस्थेतील कर्मचारी असल्यास त्यांना विशेष संवर्ग दोनचा लाभ मिळणार आहे.