वाहतूक आराखडा कागदावरच

सातारा - राधिका रोडवर वाहतूक नियमनाअभावी वारंवार होणारी वाहतूक कोंडी नागरिकांना दररोजची डोकेदुखी ठरत आहे.
सातारा - राधिका रोडवर वाहतूक नियमनाअभावी वारंवार होणारी वाहतूक कोंडी नागरिकांना दररोजची डोकेदुखी ठरत आहे.

सातारा - शहरातील वाहतुकीचे नियमन सुस्थितीत होण्यासाठी शहर पोलिसांनी तयार केलेला सुधारित वाहतूक आरखडा कागदावरच आहे. दंड वसुलीच्या सापळ्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वाहतूक विभागाने आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी लक्ष दिले तर, सर्वसामान्य सातारकरांची वाहतूक सुसह्य होऊ शकते.  

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील विविध शहरांमधील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. विविध समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागत आहे. शहरामध्ये गर्दीच्या वेळी तर, विदारक परिस्थिती असते. त्यावर मात करण्यासाठी वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले होते. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी वाहतूक शाखा व वाहतूक सल्लागार समितीच्या माध्यमातून विविध घटकांशी चर्चा करून शहराच्या वाहतुकीचा सुधारित आराखडा तयार केला आहे. 

आराखड्यातील उपाययोजना
आराखड्यात वाहतुकीशी संबंधित सर्वच घटकांवर विचार करून उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. बंद सिग्नल यंत्रणा सुरू करणे, नवीन सिग्नल बसवणे, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंगची ठिकाणे वाढविणे, पार्किंगचे पट्टे मारणे, दैनंदिन अतिक्रमण निर्मूलन पथक, इमारत मंजुरीत ‘वाहतूक’ची ना हरकत, फलक लावणे, एकेरी वाहतूक, अतिक्रमणे हटविणे, ट्रॅफिक वॉर्डन नेमणे, शाळांच्या भरण्या- सुटण्याच्या वेळा निश्‍चित करणे, एसटी बसचे मार्ग व इन-आउट गेट, रिक्षा थांब्यांची ठिकाणे, मर्यादा अशा मुद्यांचा समावेश होता. 

पोलिसांचे जथ्थे असतात उभे 
सातारकरांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असा हा आराखडा मात्र कागदावरच आहे. पालिकेने त्यांच्याकडील कामाची पूर्तता केलेली नाही आणि वाहतूक पोलिस दंड वसुलीचे सापळे रचण्यातच मग्न असल्याची शहराची स्थिती आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक शिस्त पुरती बिघडली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट, पोवई नाका, वाढेफाटा, राजवाडा अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांचे जथ्थे उभे असल्याचे दिसतात. वाहतूक नियमनाऐवजी कोणाला दंड ठोकता येईल, याचाच विचार त्यांच्याकडून सुरू असतो. 

केवळ बकरा शोधण्यात व्यस्त 
एकेरी अंमलबजावणी करण्यात नागरिकांना प्रवृत्त करण्याऐवजी त्याला दंड कसा ठोकता येईल, याचा विचार करून पोलिस रस्त्यावर उभे असल्याचे दिसतात. दररोज पोलिस तिथे असतो हे नागरिकांना समजले तर, ते नियमांची अंमलबजावणी करतील. मात्र, एकेरीच्या अंमलबजावणीकडे शहर वाहतूक शाखेची धरसोड वृत्ती जबाबदार आहे. पोलिसांची नेमणुकीची ठिकाणे योग्य पद्धतीने व दररोज होत नाहीत. गाड्यांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध झालेली नाही. मात्र, क्रेनची संख्या वाढवली गेली आहे. वाहतूक कोंडी असली तरी, कर्मचारी मात्र, पावत्या फाडण्यासाठी बकरा शोधण्यातही व्यस्त असतात. 

वाहतूक नियमन डोकेदुखी 
सिग्नलला थांबलेल्या नागरिकांची तर, आयतेच पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यासारखी अवस्था आहे. बेदरकार वाहन चालविणाऱ्यांवर रेकॉर्डपुरत्याच कारवाया होतात. अन्यथा शहरामधून त्यांची ‘धूमस्टाईल’ दररोज सुरू असते. मात्र, शिस्तीत वाहन चालविणारे पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. वाहन चालविण्याचा परवाना, कागदपत्रे बरोबर असली तरीही कोणते ना कोणते कारण सांगून दंड आकारलाच जात आहे. महिला, मुलींनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक नियमन सातारकरांसाठी डोकेदुखी बनली आहे.

पोलिस अधीक्षकांनी लक्ष देणे गरजेचे
वाहतूक शाखा वाहतूक नियमनाऐवजी दंड वसुली करण्यातच मग्न आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही कागदपत्रे असली तरीही दंड वसूल करायचाच या मानसिकतेतून विविध कारणे शोधली जात आहेत. त्यामुळे सातारकरांमध्ये पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी वाहतूक शाखेच्या कारभाराकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीत हे कर्मचारी गुंतवणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com