नियम मोडणाऱ्यांना दंडाची पावती घरी

नियम मोडणाऱ्यांना दंडाची पावती घरी

सातारा - वाहतूक कर्मचाऱ्यांनी दिलेला थांबण्याचा आदेश धुडकावत पळून जाणाऱ्यांवरही आता दंडात्मक कारवाई होणार आहे. संबंधितांच्या पत्त्यावर दंडाची पावती पाठविण्याची प्रक्रिया दोन दिवसांत साताऱ्यात सुरू होणार आहे. त्याचबरोबर क्रेनच्या साह्याने नेल्या जाणाऱ्या वाहनांचा दंड वाहनधारकांकडून जागेवर भरून घेण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

शहरात वाहतुकीच्या नियमनासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केलेली असते. कागदपत्रे नसणे, लायसन्स नसणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, नंबर प्लेट नसणे किंवा चुकीची असणे, सिग्नल तोडणे, भरधाव वेगात चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे अशा विविध प्रकारच्या कलमांनुसार वाहतूक पोलिस वाहनचालकांकडून दंड आकारतात. वाहतूक पोलिसांनी थांबण्याची सूचना केल्यानंतर बहुतांश नागरिक कायद्याचा आदर राखत थांबतात. त्यांनी मागणी केलेली कागदपत्रे दाखवतात किंवा विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देतात. त्यानंतर उपलब्ध नसलेल्या कागदपत्रांच्या आधारे किंवा केलेल्या चुकीबद्दल वाहतूक पोलिस कायद्यानुसार संबंधित वाहनचालकाकडून दंडाची आकारणी करतात. त्यामुळे केवळ कायद्याचा आदर राखणारे नागरिकच दंडात्मक कारवाईच्या कचाट्यात सापडत होते. वाहतूक पोलिसांचा आदेश धुडकावत धूमस्टाईलने पळून जाणारे मात्र कायद्याच्या हाताला लागत नव्हते. अनेकदा वाहतूक पोलिस संबंधितांचा पाठलाग करायचे. त्यामुळे पळून जाणारा आणखी वेग वाढवायचा. त्यातून अपघाताचे अनेक प्रसंग घडले आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनाही कारवाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पळून जाणाऱ्या वाहनचालकांच्या मागे वाहतूक पोलिस जात नव्हते. त्यामुळे वाहतूक पोलिसांची नजर चुकवून पोवई नाक्‍यावरील सिग्नल तोडून पळणाऱ्यांची संख्या वाढली होती. 

पळून जाणारे वाहनचालकांनाही चाप लावण्यासाठी आता वाहतूक विभाग सरसावला आहे. त्यासाठी ई-चलनची यंत्रणा वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्यापासून त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. नव्या पद्धतीत एखादा वाहनचालक वाहतूक पोलिसांचा आदेश किंवा सिग्नल तोडून पळून गेल्यास तसेच भरधाव वेगाने गाडी चालवत गेल्याचे निदर्शनास आल्यावर वाहतूक पोलिस संबंधिताच्या वाहनाचा क्रमांक टिपून घेणार आहे. त्याच्या आधारे संबंधिताचा पत्ता वाहतूक पोलिसांना उपलब्ध होणार आहे. त्यानंतर ई-चलन तयार करून दंडाची पावती वाहनमालकाच्या घरी पाठवली जाणार आहे. दंडाची रक्कम वाहतूक शाखेत येऊन भरण्यास संबंधिताला सात दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतरही वाहनमालक दंड भरण्यासाठी वाहतूक शाखेत आला नाही, तर त्याच्यावर वाहन कायद्यानुसार खटला दाखल करून तो न्यायालयात पाठविला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याचा आनंद लुटणाऱ्यांना आता कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही.

क्रेनची पावती जागेवरही
नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने वाहतूक शाखेच्या क्रेनच्या माध्यमातून उचलली जातात. आतापर्यंत एकदा वाहन गाडीत चढविल्यावर ते वाहन चालकाला वाहतूक शाखेत जाऊनच घ्यावे लागत होते. त्याचा अनेकांना त्रास होत होता. आता क्रेनमधील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याकडेही पावती पुस्तक देण्यात आले आहे. त्यामुळे गाडी क्रेनमध्ये चढवल्यावर वाहनचालक तेथे आल्यास त्याला जागेवरच दंडाची रक्कम भरता येणार आहे. त्यासाठी लवकरच ई-चलन उपलब्ध करून दिले जाणार आहे.त्यासाठी वाहतूक शाखेने १५ यंत्रांची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com