सातारा जिल्हा रुग्णालय मार्गावरील दुभाजकाला झाडांची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

सातारा - पोवई नाका ते जिल्हा रुग्णालयमार्गे सदरबझार या रस्त्यावरील दुभाजक झाडांच्या प्रतीक्षेत आहे. पालिकेला सहा वर्षांत कधीही या रस्त्यावर वृक्षारोपण करण्याची आठवण झाली नाही. तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडे लावण्याची आठवण पालिकेला किमान या पावसाळ्यात तरी होणार का, असा सवाल पर्यावरणप्रेमी नागरिक विचारत आहेत.

सातारा - पोवई नाका ते जिल्हा रुग्णालयमार्गे सदरबझार या रस्त्यावरील दुभाजक झाडांच्या प्रतीक्षेत आहे. पालिकेला सहा वर्षांत कधीही या रस्त्यावर वृक्षारोपण करण्याची आठवण झाली नाही. तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडे लावण्याची आठवण पालिकेला किमान या पावसाळ्यात तरी होणार का, असा सवाल पर्यावरणप्रेमी नागरिक विचारत आहेत.

केंद्र शासनाच्या ‘आयडीएसएमटी’ या योजनेतून पोवई नाका ते जिल्हा रुग्णालयमार्गे जरंडेश्‍वर नाका या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरणाचे काम मंजूर झाले होते. प्रत्यक्ष काम सुरू व्हायला तब्बल आठ वर्षे लागली. तत्कालीन सोयीसाठी पालिकेने या रस्त्याचे दोन टप्पे केले. यातील दुसरा टप्पा कधीही न सुरू होणारा ठरला. पहिल्या टप्प्यात सदरबझार कॅनॉलवरील पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले. त्यामध्ये दुभाजक, दोन्ही बाजूस पदपथ, त्याखाली भुयारी गटार आणि दुभाजकावर पथदिवे व शोभिवंत झाडे असा या कामाचा आराखडा होता. 

२०११ मध्ये रस्त्याचे काम झाले. जिल्हा रुग्णालयासमोरील काही रहिवाशांची अतिक्रमणे होती. ती हटविताना काही प्रमाणात वृक्षतोडही करण्यात आली. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर पालिकेने तोडाव्या लागणाऱ्या झाडांच्या बदल्यात पाचपट झाडे याच रस्त्यावर लावण्याचे बंधन होते. पण, ही झाडे काही आजतागायत लागली नाहीत. उलट दुभाजकही तसाच बोडका ठेवण्यात आला. 

बिल्डर असोसिएशनने कालिदास पंपापासून काही अंतरापर्यंत दुभाजकात शोभिवंत झाडे लावली. काही काळ ती चांगली जोपासलीही. तथापि, हे काम संपूर्ण दीड किलोमीटरमध्ये झाले नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या प्रवेशद्वारापासून पुढे आंबेडकर झोपडपट्टीपर्यंत हा दुभाजक तसाच बोडका राहिला आहे. आता काही वाहनांनी ठोकरल्यामुळे जिल्हा रुग्णालयाजवळ दुभाजकातील शहाबादी फरशा फुटल्याने दुभाजक उघडा पडला आहे.

पालिकेने गेल्या सहा वर्षांत कधीही या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या रस्त्याच्या सुशोभिकरणाची शोभा झाली आहे..! पुण्याकडून महामार्गावरून कास पठाराला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक याच रस्त्याने जरंडेश्‍वर नाक्‍यावरून पोवई नाक्‍याकडे येतात. पर्यटकांपुढे या शहराचे चित्र फारच ओंगळवाणे दिसते. पालिकेने याचा विचार करावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. 

दुसऱ्या टप्प्याचा मुहूर्त कधी?
केंद्र शासनाच्या ‘आयडीएसएमटी’ या योजनेतून ‘सिव्हिल’ रस्त्याचे रुंदीकरण, सुशोभिकरण करण्यात आले. सुरवातीस जरंडेश्‍वर नाक्‍यापर्यंत रुंदीकरणास मंजुरी मिळाली होती. पालिकेने या रस्त्याचे दोन टप्पे केल्याने दुसरा टप्पा कधीही पूर्ण झाला नाही. २००१ मध्ये मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामाची तीन वेळा भूमिपूजने झाली. दस्तुरखुद्द (कै.) गोपीनाथ मुंडे एकदा भूमिपूजनाचा नारळ फोडण्यासाठी येऊन गेले आहेत. या रस्त्याच्या कामाच्या दर्जावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी कामावरील आक्षेपांचा काय निकाल लावला, हे अद्याप समजले नाही. रस्त्यावर जागोजागी जाणवणारे उंचवटे, दुभाजकाच्या सुशोभिकरणाकडे झालेले दुर्लक्ष, अपुऱ्या लांबीचे पदपथ, रस्त्याच्या रुंदीत तफावत या काही ठळक त्रुटी वाहनचालकांना जाणवतात.