"सायली'समोरील यु टर्न धोकादायक 

"सायली'समोरील यु टर्न धोकादायक 

सातारा - पोवई नाक्‍यावरून राजवाड्याकडे जाण्यासाठी मोनार्क हॉटेलसमोरील रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, वाहतूक शाखेचा हा निर्णय वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता आहे. 

यात अनेक वाहनचालकांकडून सायली हॉटेलसमोर यु टर्न घेतला जात  आहे. त्याचवेळी राजवाड्याकडून येणारी वाहने वेगाने येत असल्याने  या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या संभाव्य अपघातप्रवण क्षेत्रावर मार्ग काढणे आवश्‍यक आहे. 

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाक्‍याबरोबर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पोवई नाक्‍यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. वाहतूक पोलिस व त्यांच्या मदतीसाठी होमगार्डचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. तरीही होणारी कोंडी टाळण्यासाठी राजवाड्याकडून पोवई नाक्‍याकडे जाण्यासाठी मराठा खानावळमार्गे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. तसेच पोवई नाका, शाहूनगरकडून राजवाड्याकडे जाण्यासाठी मोनार्क हॉटेलसमोरील रस्त्याचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोवई नाक्‍यावरील वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आहे. या रस्त्यावरून जात असताना रविवार पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी रस्ता ओलांडला जावू नये, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बॅरेकेटिंग सायली हॉटेलपर्यंत वाढविले आहे. पोवई नाक्‍यावर राजपथ क्रॉस होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली. मात्र, जवळचा मार्ग पकडण्याच्या वाहनचालकांच्या धोरणामुळे सायली हॉटलेच्या समोरच अनेकजण यु टर्न घेत आहेत.

या ठिकाणी राजवाड्यावरून येताना तीव्र उतार आहे. वरून येणारी वाहने वेगात येत असतात. अशा परिस्थितीत सायली हॉटेलसमोर यु टर्न घेणारी वाहने रस्त्याच्यामध्येच येतात. त्यामुळे वरून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक मारावा लागतो. चारचाकी वाहनांनी यु टर्न घेतल्यावर तर, वाहन पूर्णपणे थांबवावे लागते. त्यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण होत आहे. पावसाळ्यामुळे हा रस्ता घसरडा झालेला आहे. त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्यास वाहनचालक घसरून पडण्याची शक्‍यता आहे. हा संभाव्य धोका दिसत असल्याने आज वाहतूक शाखेने या ठिकाणी नो यु टर्नचा छोटा फलक लावलेला आहे. त्यावरून वाहतूक शाखेलाही या धोक्‍याची जाणीव झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, एकतर हा फलक चुकीचा लावला आहे. उजव्या बाजूला नो यु टर्न ऐवजी डाव्या बाजूला नो यु टर्न असे चिन्ह या फलकावर आहे. त्यामुळे वाहनधारकांची फसगत होण्याची शक्‍यता आहे. तसेच हा फलक लावलेला असूनही अनेक वाहनचालक फलक लावण्यापूर्वी  आणि पुढेही वाहन वळवत आहेत. त्यामुळे केवळ फलक लावून या ठिकाणचा प्रश्‍न सुटेल, अशी परिस्थिती नाही. त्यावर मार्ग काढणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com