उदयनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

उदयनराजेंना उच्च रक्तदाब असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तो ग्राह्य मानून न्यायाधिशांनी उदयनराजेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अतिरिक्त अधीक्षकांच्या गाडीतूनच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 

सातारा : खंडणीच्या गुन्ह्यात गेले काही दिवसांपासून सातारा शहरापासून लांब असलेले खासदार उदयनराजे भोसले आज (सोमवारी) स्वत:हून पोलिसांत हजर झाले. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालयीन कोठडीच मागण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने उदयनराजेंना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना सातारा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सात दिवसांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.

त्यापूर्वी उदयनराजेंचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. उदयनराजे स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. 18 मार्चला घडलेल्या प्रकाराची 23 मार्चला नोंद झाली. या दोन दिवसांत काय घडले ते सर्वांना माहित आहे. फिर्यादी स्वत: चालत प्रतिभा रुग्णालयात दाखल झाला होता. तपासणीनंतर संपूर्ण व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचा भाग नसल्याचेच स्पष्ट होत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

उदयनराजेंना उच्च रक्तदाब असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तो ग्राह्य मानून न्यायाधिशांनी उदयनराजेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अतिरिक्त अधीक्षकांच्या गाडीतूनच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 

छातीत वेदना 
जिल्हा रुग्णालयामध्ये उदयनराजेंना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी तपासणी करत असताना उदयनराजेंनी छातीमध्ये वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची आवश्‍यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटले. त्यानुसार उदयनराजेंना दाखल करून घेण्यात आले. सुरक्षिततेच्या उपाय योजना म्हणून त्यांना रुग्णालयातील वरच्या मजल्यावरील खोलीत ठेवण्यात आले. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयाला छावणीचे रूप आले होते. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: