आरोप करणाऱ्यांनी समोर येण्याची हिंमत ठेवावी - उदयनराजे

आरोप करणाऱ्यांनी समोर येण्याची हिंमत ठेवावी - उदयनराजे

सातारा - लोकशाही आहे याचा अर्थ कोणीही उत्मात करावा असे नाही. मी गप्प आहे, तोपर्यंत गप्प आहे. आरोप करणाऱ्यांनी गांधी मैदानावर समोरासमोर येण्याची हिंमत ठेवा. कोणाच्या कार्यकर्त्यांवर मोक्का आणि खंडणी, सावकारीचे गुन्हे दाखल आहेत, हे पाहा आणि हेच माझ्यावर आरोप करत आहेत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत पक्षांतर्गत विरोधकांना लगावला.

शासकीय विश्रामगृहात खासदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालिकेत घंटागाड्यांच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, 'मी काहीही न बोलण्याचे ठरवले होते. परंतु, माझ्याबद्दल उलट-सुलट आरोप झाल्यामुळे बोलावे लागले. मी भ्रष्टाचार कधीच केला नाही आणि खपवूनही कधी घेतला नाही. अशा वेळी माझ्यावर तोडपाणी केल्याचे आरोप केले जातात, हे वेदनादायी आहे. कोणाच्या कार्यकर्त्यांवर मोक्का लागला, हे तुम्हीच पाहा. एक फलटणचा नगरसेवक आणि एक आमचे प्रिय आमदार यांच्याजवळच्या लोकांच्यावरच खंडणीचे गुन्हे दाखल आहेत आणि हेच माझ्यावर आरोप करतात.'' साताऱ्यातील घंटागाड्यांच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, 'एक महिन्यात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागली नाही तर त्या त्या वॉर्डातील लोकांच्या सांगण्यानुसार घंटागाडी बदलली जाईल. वेळप्रसंगी सगळ्या घंटागाड्या बदलाव्या लागल्या तरी चालेल. पालिकेकडून घंटागाड्यांची बिले कधीही अडवली गेली नाहीत. कचरा उचलणे ही त्यांची जबाबदारी आहे.''

उदयनराजे म्हणाले, "1999 मध्ये ऐन तारुण्यातले 22 महिने गेले, तरी गप्प बसलो. आता मधल्या काळात खंडणी घेतल्याचा आरोप केला. मला दात टोकरून खायची सवय नाही. आजपर्यंत दिलंय ते कधी हिसकावून घेतले नाही.'' जिल्ह्यातील नेते मंडळी आज आम्ही असं करू, तसं करू म्हणत आहेत. त्यांना करायचेच होते तर ते त्यांनी फार पूर्वी केले असते. त्यांच्या ताब्यात सत्ता होती, मंत्रिपद होते, त्यावेळी त्यांनी साताऱ्यासाठी नेमकं काय केलं, असा सवालही त्यांनी केला.

शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. अलीकडच्या राजकारणात बघितलं तर असे लोक बघायलासुद्धा मिळत नाहीत. ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांनी जास्त पावसाळे बघितले आहेत. त्यामुळे कोण कसं आहे, हे त्यांना माझ्यापेक्षा जास्त समजतं.
- खासदार उदयनराजे भोसले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com