उदयनराजेंची ‘ती’ क्‍लिप व्हायरल

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; पोलिस कारवाईची अपेक्षा

सातारा - साताऱ्यात डॉल्बीचा आवाज घुमला रे घुमला अशा स्वरूपाची खासदार उदयनराजे भोसले यांची जुनी व्हिडिओ क्‍लिप सोशल मीडियातून व्हायरल करून साताऱ्यातील अनंत चतुर्दशी दिवशीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ‘श्रीं’ची डॉल्बीविरहित आदर्श मिरवणुकीच्या लौकिकाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांच्या डॉल्बीबाबत दिशाभूल करणारी क्‍लिप व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांनी वेळीच मुसक्‍या आवळल्या पाहिजेत. 

साताऱ्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही परिस्थितीत यंदा मिरवणुकीत डॉल्बी लागणार नाही, याची पुरेपूर काळजी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली. त्यांच्या प्रयत्नांना मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉल्बीचे ‘विसर्जन’ केले. चार- पाच वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री १२ नंतर पोलिसांनी डॉल्बी वाजविण्यास बंदी केली, की खासदार उदयनराजे भोसले हे मंडळांच्या बाजूने ठामपणे उभे राहात होते. त्यांच्या निर्णयाने डॉल्बीचा आवाज चढायचा आणि पुन्हा कर्णकर्कश आवाजाच्या तालातच युवा वर्ग नाचत राहायचा. तत्कालीन पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी ही परिस्थिती बदलली. रात्री १२ नंतर डॉल्बीचा आवाज बंद झाला. त्यानंतर डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील या अधिकाऱ्यांनीही डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीचा कळस चढविला. पोलिसांच्या प्रयत्नांना मंडळांनी, लोकप्रतिनिधींनी बळ दिल्यानेच हे शक्‍य झाले हेही तितकेच खरे. 

फेसबुकवरील एका ग्रुपबरोबरच काही जणांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘लावा डॉल्बी मी बघतो...’ अशा स्वरूपाची क्‍लिप नुकतीच पोस्ट झाली. अवघ्या २० तासांत ही क्‍लिप तीन हजार जणांनी शेअर केली. त्यातून सुमारे दोन लाख व्हीव्हज्‌चा टप्पा पार केला. व्हॉटसॲपच्या माध्यमातून देखील असंख्य लोकांपर्यंत ही क्‍लिप पोचली. त्यामुळे साताऱ्यात डॉल्बीचा आवाज घुमला घुमला... अशी चर्चा जगभरात होऊ लागली. जी घटना घडलीच नाही ती लोकांपर्यंत पोचली. दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाबतीतही, तसेच होऊ लागले आहे. त्यांची बेधडक कृती सर्वांना ज्ञात असली, तरी सध्या डॉल्बी वाजविण्याच्या बाबतीत लोकांच्या भावना तीव्र आहेत. अशी वेळी खासदार उदयनराजेंची जुनी व्हिडिओ क्‍लिप पोस्ट करून उदयनराजेंचा डॉल्बीबंदीस विरोध असा संदेश लोकांपर्यंत गेला आहे. हे खासदार भोसले यांच्या प्रतिमेस मारक ठरत असल्याची चर्चा समर्थकांमध्ये आहे.