जिल्हा राज्यात अग्रेसर बनवूया - विजय शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सातारा - जिल्हा राज्यात अग्रेसर बनविण्याससाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. 

सातारा - जिल्हा राज्यात अग्रेसर बनविण्याससाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. 

स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर आदी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस, गृहरक्षक दलाची मानवंदना स्वीकारून उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

श्री. शिवतारे म्हणाले, ‘‘खटाव, माण आणि फलटण भागातील जमिनींना धरणाचे पाणी कालव्याने आणि आता बंदिस्त पाइपने देण्याची योजना आखून ते बारामाही पाण्याखाली आणण्याची योजना आहे. जलयुक्त शिवार योजनेचे परिणाम या जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हा संपूर्ण देशातून तिसरा आला आहे. जिल्ह्यात सात हजार १४५ घरकुले बांधून द्यावयाची असून, त्यापैकी तीन हजार ५१५ घरकुले पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी,  उपग्रहाद्वारे निरीक्षण (जिओ टॅगिंग) आणि घरकुलांना मंजुरी देण्यात जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर राहिला आहे. राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण २८ नळ पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. शासनाकडून १८ योजनांना मंजुरी मिळाली असून, या कामांसाठी १०.३३ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. 

जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेमुळे माण व खटाव या भागातील २७ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ प्रस्तावित आहे. ही उपसा योजना लवकर कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने कृष्णा नदीवरील बॅरेजचे काम व पंपगृह क्रमांक एकचे ५४ फूट उंचीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. त्यासाठी जादा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेच्या थकीत वीज बिलांबाबत शासनाने मार्ग काढलेला आहे. यापुढे शेतकऱ्यांनी १९ टक्के व इतर विभागांकडून ८१ टक्के भरणा करावयाचा आहे. याबाबतच्या सूचना व हरकती मागविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  

या प्रसंगी प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे आदींसह अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. या वेळी जिल्हा माहिती कार्यालयाने केलेल्या आपला जिल्हा सातारा पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, नूतन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालय लालफितीतच  
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व १०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय सुरू करण्याकामी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मालकीची २५ एकर जागा देण्याबाबत २०१५ मध्ये शासनास प्रस्ताव सादर केला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यावरून गेले दोन वर्षे हा प्रस्ताव लालफितीत अडकल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरीबाबत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नसल्याचे या वेळी स्पष्ट झाले.