वड्यावर चालतो अनेकांचा चरितार्थ

वड्यावर चालतो अनेकांचा चरितार्थ

सातारा - ज्या पेठेत एकेकाळी रस्त्यावर येण्याची वेळ आली, त्या ठिकाणी आज तो कष्ट करून स्वाभिमानाने हक्काची भाजी-भाकरी खातोय. केवळ स्वत:चा नव्हे तर त्याच्यामुळे पाच-दहा कुटुंबांचा चरितार्थ चालतो. संजय गणपत पाटील असे त्यांचे नाव. पंताच्या गोटातील ‘पाटील वडेवाले’ या छोट्या हॉटेलचा आता शाखा विस्तार झाला आहे. ‘पाटील वडापाव- चटणीच्या चवीने परिसरात नाव होतेच, परंतु; ‘सकाळ’ने केवळ नाव नव्हे तर माझ्या श्रमाला प्रतिष्ठा आणि अंगात उभे राहण्याचे बळ दिले,’ अशी प्रतिक्रिया संजय पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

एका वैयक्तिक वादात पैसा गेला आणि राहतं घरही. त्यामुळे पाटील कुटुंबीयांना अक्षरश: रस्त्यावर यावं लागलं. शिक्षणाची गोडी असूनही परिस्थितीपुढे त्यांना नुकतेच सुरू झालेले महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. मात्र, त्यांनी न लाजता आणि न डगमगता पूर्वीचे हॉटेल एका छोट्या गाड्यावर सुरू केले. त्याच पंताच्या गोटातून त्यांच्या परिस्थितीबरोबरच्या संघर्षाला सुरवात झाली. आर्थिक कुचंबना, आजारपण, वाढते खर्च, अतिक्रमण मोहिमा अशा अनेक अडचणींना तोंड देत त्यांचा परिस्थितीशी संघर्ष सुरू राहिला. दै. ‘सकाळ’मध्ये ‘रस्त्यावरचे आयुष्य’ हे कष्टकऱ्यांच्या संघर्षावर प्रकाशझोत टाकणारे सदर २००९ मध्ये प्रसिद्ध होत होते. त्यामध्ये संजय पाटील यांची जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याच्या तयारीवर लेख प्रसिद्ध झाला होता. दिवस पालटत गेले. संजय यांनी कष्टपूर्वक सुरू केलेल्या व्यवसायाला पुढे चांगले दिवस पाहायला मिळाले. त्यांच्या हॉटेल व्यवसायामुळे आज त्यांच्याबरोबरच चार ते पाच कुटुंबे स्थिरस्थावर झाली आहेत. 

संघर्ष जरी संजय पाटील व त्यांचे कुटुंबिय करत असले तरी ते आपल्या यशाच्या श्रेयात ‘सकाळ’चा वाटा सिंहाचा असल्याचे  अभिमानाने सांगतात. ‘पाटील वडापाव लोकपरिचित होता. ‘सकाळ’ने त्याला जिल्ह्यात तसेच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात पोचवला. दूरवरचे पै-पाहुणे, आप्तेष्टांचे कौतुक व अभिनंदनाचे दूरध्वनी आले,’’ अशी आठवण पाटील यांनी सांगितली. आठ महिन्यांपूर्वी ‘पाटील वडेवाले’ या व्यवसायाची शाखा राजपथावर कन्याशाळेशेजारी सुरू झाली आहे. पाटील यांचे थोरले बंधू सुधाकर व वहिनी सौ. सुवर्णा ही शाखा सांभाळतात. 

साताऱ्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट शाम व त्यांच्या पत्नी उज्ज्वला गीते हे थोरला भाऊ व भावजयीसारखे माझ्या मागे उभे राहिले. त्यांनीच लढण्याचे बळ व अडचणीच्या वेळी आधार दिला. आई सुलोचना, पत्नी वैशाली यांच्या साथीशिवाय मी पुढे जाऊ शकलो नसतो.
- संजय पाटील, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com