कुटुंबप्रमुखानेच रचला खुनाचा कट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

वाई - मांढरदेव येथे काल उघडकीस आलेले विषबाधेचे प्रकरण कौटुंबिक कलहातून झालेला खुनाचा प्रयत्न असल्याचे आज निष्पन्न झाले. करणी उतरविण्याच्या नावाखाली संपूर्ण कुटुंबाला विषारी औषध प्यायला प्रवृत्त करून मुलाचा खून, तर इतर सदस्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती येथील एकावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे. 

वाई - मांढरदेव येथे काल उघडकीस आलेले विषबाधेचे प्रकरण कौटुंबिक कलहातून झालेला खुनाचा प्रयत्न असल्याचे आज निष्पन्न झाले. करणी उतरविण्याच्या नावाखाली संपूर्ण कुटुंबाला विषारी औषध प्यायला प्रवृत्त करून मुलाचा खून, तर इतर सदस्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती येथील एकावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे. 

संबंधित कुटुंबप्रमुख विष्णू नारायण चव्हाण (रा. एसटी स्टॅंड जवळ, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. बारामती येथील विष्णूची मुलगी तृप्ती विष्णू चव्हाण (वय 16), पत्नी सुनीता विष्णू चव्हाण (45), आई मुक्ताबाई नारायण चव्हाण (58), मुलगा स्वप्नील विष्णू चव्हाण (23) व दुसरी मुलगी प्रतीक्षा विष्णू चव्हाण यांना काल मांढरदेव येथे विषबाधा झाल्याचे समोर आले. यातील स्वप्नीलचा काल उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. इतर चौघांवर साताऱ्यात जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस तपासामध्ये हा प्रकार विषबाधेचा नसून कुटुंब प्रमुखानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. 

याबाबत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, विष्णू चव्हाण हा कुटुंबप्रमुख आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरात कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे विष्णू वैफल्यग्रस्त बनला होता. त्यातूनच त्याने संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने कुटुंबीयांना करणी उतरविण्याच्या नावाखाली विषारी औषध पाजायचा विचार केला. आपण सांगितल्याप्रमाणे कुटुंबीय वागतात का, हे पाहण्यासाठी आधी घरामध्ये गरम पाण्यात उतारा केल्याचे दाखवत सर्वांना प्यायला सांगितला. सर्व जण सांगितल्याप्रमाणे करतात, हे निदर्शनास आल्यावर त्याने विषारी औषधाचा वास येऊ नये म्हणून काही पदार्थांचे मिश्रण त्यात केले. त्यानंतर सर्वांना मांढरदेव येथे जाऊन दिलेल्या बाटलीतील उतारा प्रत्येकाने पिऊन नंतर देवीच्या दर्शनाला जाण्यास सांगितले. जेवणनंतर उतारा करायचे, असे त्याने सर्वांना सांगितले होते. 

त्यानुसार विष्णू सोडून चव्हाण कुटुंबातील इतर पाच जण स्कार्पिओ गाडीतून (एमएच 42 एएच 7074) मांढरदेव येथे जाण्यासाठी सकाळी अकरा वाजता बारामती येथून निघाले. दुपारी तीनच्या सुमारास ते मंदिराजवळ पोचले. मंदिरात जाण्यापूर्वी विष्णूने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने बरोबर आणलेल्या बाटलीतील विषारी द्रव्य कपाच्या साह्याने प्यायले. त्यानंतर सर्व जण देवीच्या दर्शनाला गेले. दर्शन घेतल्यानंतर स्वप्नीलला अस्वस्थ वाटू लागले. त्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीच्या चालकास फोन करून वर बोलावले. त्याच्या बहिणीचाही फोन चालकास गेला. चालक गाडी वर घेऊन गेला आणि सर्वांना वाईला आणले. स्वप्नीलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर इतर चौघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या घटनेची पोलिस माहिती घेत असतानाच चालक भीमसेन अर्जुन जाधव यालाही रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यालाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेची माहिती स्वप्नीलचे वडील व अन्य नातेवाईकांना दिली. काल सायंकाळी स्वतः विष्णू चव्हाण आपल्या इतर नातेवाईकांसमवेत ग्रामीण रुग्णालयात आला. काहीच केले नाही अशा आविर्भावात तो पोलिसांसमोर वागत होता. मुलाच्या मृत्यूचे दुःखही त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हते. त्यामुळे पोलिसांना संशय येऊ लागला होता. 

चौकशीअंती आज दुपारी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार व पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी घटनास्थळी व पोलिस ठाण्यास भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. 

...नंतर मी ही आत्महत्या करणार होतो 
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्‌माकर घटनवट व वाईचे सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. येडगे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विष्णूच्या आईला विश्‍वासात घेतले. त्या वेळी मांढरदेवला येण्यापूर्वी मंगळवारी रात्री विष्णूने मला बाटली आणून दिल्याचे मुक्ताबाईंनी सांगितले. आपल्या कुटुंबावर कोणीतरी करणी केली आहे. ती उतरविण्यासाठी मी मांत्रिकाकडून औषध तयार करून आणले आहे. बुधवारी तुम्ही चौघांनी उपवास धरा आणि काळेश्‍वरीच्या दर्शनासाठी मांढरदेवला जा. देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून लांब झाडीत चालत जा आणि ते प्रत्येकाने प्या. औषध कडू लागेल आणि त्याचा वासही येईल; पण तुम्ही सगळ्यांनी ते प्यायचे, तरच करणी उतरेल, असे त्याने सांगितल्याचे मुक्ताबाई म्हणाल्या. त्यानंतर पोलिसांनी विष्णूकडे मोर्चा वळविला. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मोठ्या नेत्यांच्या नावाचा पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने पाच जणांचा काटा काढण्यासाठी आपणच कट रचल्याची कबुली दिली. सगळे संपल्याची माहिती मिळाल्यावर मी ही आत्महत्या करणार होतो, असे त्याने पोलिसांना सांगितले.