वाईत आगीत साडेचार लाखांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

वाई - येथील ब्राह्मणशाहीतील हॉटेल नवजीवन व गुरुदत्त आयस्क्रिम पार्लर अँड स्नॅक्‍स या दोन दुकानांना मध्यरात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

वाई - येथील ब्राह्मणशाहीतील हॉटेल नवजीवन व गुरुदत्त आयस्क्रिम पार्लर अँड स्नॅक्‍स या दोन दुकानांना मध्यरात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

शेवडे बधूंच्या ब्राह्मणशाही येथील हॉटेल नवजीवन व लगतच्या दीपक जमदाडेंच्या गुरुदत्त आयस्क्रिम पार्लरला अचानक आग लागली. धुरकट वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांना दुकानांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने दुकान मालक व अग्निशामक दलाला कळविले. परिसरातील कार्यकर्ते, स्थानिक नगरसेवक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पालिकेच्या अग्निशमन बंबाने दोन खेपा केल्या. शेख व जगताप यांच्या टॅंकरमधील पाण्याने दोन तासांनंतर आग विझविण्यात आली. या वेळी आगीचा प्रचंड लोट उसळल्याने लगतच्या इमारतींना झळ बसली. दोन्ही दुकानातील गॅस सिलिंडर सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने खांबावरील कनेक्‍शन तोडून वीजपुरवठा खंडित केला. 

या वेळी नगरसेवक भारत खामकर, महेंद्र धनवे, नंदकुमार खामकर, अनंतराव शेवडे, सहायक पोलिस निरीक्षक बबन येडगे, सहायक फौजदार त्रिंबक अहिरेकर, पालिकेचे आरोग्य विभागप्रमुख गुणवंत खोपडे, अग्निशामक दलाचे प्रवीण गाडेकर, पंकज तनपुरे, पुंडलिक काळोखे, सुरेश सकटे, प्रसाद शेवडे, प्रमोद शेवडे, शिरीष जाधव, प्रमोद दळवी, चिमा खामकर, संतोष खैरे, सतीश जोशी, नितीन झोरे, विवेक झोरे, नितीन ढवण, जितेद्र खैरे आदींनी आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला. 

दोन्ही दुकानांतील साहित्य जळून खाक 
महसूलच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचा पंचनामा केला. त्यामध्ये "गुरुदत्त'मधील डीपफ्रिज, चार फ्रिज, कॉफी मशीन, सॅन्डवीच मशीन, ओव्हन, इनव्हर्टर, बॅटरी, तसेच फर्निचर आदी साहित्य असे अंदाजे तीन लाख 61 हजारांचे, तर "नवजीवन'मधील फ्रिज, काउंटर, दोन पंखे, फर्निचरचे 44 हजारांचे व जागा मालक कमल झोरे यांचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: satara news wai fire

टॅग्स